आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोरवाडी स्मशानभूमीत सांगाडे पडले उघडे, मृतदेहांची विटंबना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - मोरवाडी स्मशानभूमीच्या वादग्रस्त ठेकेदाराबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही त्याचा बेजबाबदारपणा कायम असल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरधाममधील पुरलेले मृतदेह उघडे पडले असून, अनेक सांगाडे बाहेर येऊ लागले आहेत. मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी लाखो रुपयांचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारामुळे मृतदेहांची विटंबना होत असल्याने महापालिकेने त्याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 
 
मोरवाडी अमरधाम येथे काही नागरिक अंत्यविधीसाठी गेले असताना काही श्वान अक्षरश: मृतदेह उकरत बसलेले होते. केवळ एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी असा गंभीर प्रकार दिसून आला. याबाबत नातेवाइकांनी ठेकेदार अकबर मणियार याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. करोडो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या स्मशानभूमीची ठेकेदाराने वाट लावली असून, नागरिकांनी या सर्व प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. ज्या ज्या वेळी मृतदेहाचा अंत्यविधी करण्यासाठी नातेवाइक येथे येतात त्या त्या वेळी येथील कर्मचाऱ्यांनी मद्यपान केलेले असतात. 

मृतदेह जाळण्यासाठी लाकडे दिली जात नाही, रॉकेल दिले जात नाही. तर अनेकवेळा पैशांची मागणी केली जाते. मोफत अंत्यसंस्कार असतानाही ठेकेदार आर्थिक लूट करीत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधी नागरिकांनी अमरधामला टाळे ठोकले होते. ठेकेदार मणियार याच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली होती. मात्र, राजकीय दबावामुळे कारवाई तर झालीच नाही. त्याची मुजोरी मात्र कायम आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते भूषण राणे, राहुल सोनवणे, संजय भामरे, अर्जुन वेताळ यांनी कारवाईची मागणी केली आहे. 
 
मृतदेह अर्धवटच जाळला.. 
याच स्मशानभूमीत काही दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह अर्धवट जाळल्याचा गंभीर प्रकार घडला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा नातेवाइक राख सावरण्यासाठी आले असता त्यांना डोक्याचा काही भाग इतर शरीर पूर्णपणे जळाले नसल्याचे दिसले. मृतदेह जाळण्यासाठी लाकडे पूर्ण दिली जात नसल्याचा प्रकारही यानिमित्ताने समोर आला अाहे. याबाबत माजी नगरसेविका शीतल भामरे यांनी ठेकेदाराबद्दल तक्रार केली होती. मात्र कारवाई झाली नाही. 
मोरवाडी स्मशानभूमीत मृतदेहाची विटंबना होत असून, ठेकेदाराचे याकडे दुर्लक्ष होत आहे. हाडाचे सांगाडे असे बाहेर येत आहेत. 
 
संयमाचा अंत पाहू नका 
ठेकेदार अकबर मणियार याने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये. अन्यथा त्याची नागरिक धिंड काढतील. मृतदेहाच्या नावाखाली लाखो रुपयांचा ठेका घेऊन मनपाची लूट करीत आहे. याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. 
- रत्नमाला राणे, नगरसेविका

 खपवून घेणार नाही 
मृतदेहाची विटंबना खपवून घेणार नाही. हा ठेकेदाराचा मनपा प्रशासनाचा बेजबाबदारपणा आहे. मृतदेह उघडे पडतात, पूर्ण जाळले जात नाही. हा प्रकार अतिशय गंभीर असून कारवाई झाल्यास कायदा हातात घेऊ. 
- सुमन सोनवणे, माजी सिडको सभापती 
बातम्या आणखी आहेत...