आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात चुकीचे उपचार बेतले दोघा भावंडांच्या जिवावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - उलट्यांचा त्रास होत असलेल्या सात महिन्यांच्या आणि पाच वर्षांच्या दोन सख्ख्या भावांवर उपचारानंतरही फरक न पडल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महात्मानगर येथील डॉ. आर. एन. पंड्या यांच्या चुकीच्या उपचारामुळेच मुलांचा बळी गेल्याचा आरोप संतप्त पालक आणि नातलगांनी करून जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला. पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. दरम्यान, गंगापूर पोलिसांनी डॉक्टरचा शोध घेतला असता, तो फरार झाल्याचे सांगण्यात आले.

म्हसरूळ येथील प्रमोद कैलास पगारे यांच्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी सारिका ही आविष्कार (वय 7 महिने) आणि अनिकेत (वय 5 वर्षे) या दोघा मुलांसह सातपूर येथे माहेरी गेली होती. रविवारी दुपारी अचानक आविष्कार व अनिकेतला उलट्यांचा त्रास सुरू होताच कुटुंबीयांनी त्यांना डॉ. पंड्या यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. मात्र, दोन दिवसांनंतरही दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मंगळवारी (ता. 16) आविष्कारला इंजेक्शन व औषध देण्यात आले. हेच औषध अनिकेतलाही देण्यात आले व आई सारिका यांनाही असाच एक डोस देण्यात आला. पण, त्याच रात्री दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक होताच डॉक्टरांनी त्यांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.


रात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच आविष्कारचा मृत्यू झाला. अनिकेतलाही दुसर्‍या दिवशी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, त्याचीही प्रकृती फारशी सुधारत नसल्याने गुरुवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, अनिकेतचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणताच त्याच्या नातलगांनी आक्रोश करत डॉ. पंड्यांविरोधात कारवाईची मागणी केली. नातलगांच्या भावना अनावर झाल्याने तणाव निर्माण झाला. सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे यांनी डॉ. पंड्यांविरोधात चौकशीनंतर योग्य कारवाईचे आश्वासन दिले. गंगापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. शेजाळ यांनी पथकासह डॉ. पंड्या यांच्या रुग्णालयात धाव घेतली असता, ते दवाखाना बंद करून फरार झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी दवाखान्यातून औषधांचे नमुने जप्त केले असून, ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.