आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yashwantrao Chavan Maharashtra Open University's 26Th Anniversary

गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्पर्धेच्या युगात नवीन माध्यमे तंत्रज्ञानामुळे मोठा आमूलाग्र बदल होत आहेत. बदलत्या जगाबरोबर शिक्षण पद्धतीही बदलत आहे. कालानुरूप होणाऱ्या या बदलांना सामोरे जाण्यासाठी आता सर्वांच्याच पुढाकाराची गरज असून, भविष्यात विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्वक, दर्जेदार शिक्षण देण्यावर भर असेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २६ वा वर्धापनदिन बुधवारी (दि. १) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, विविध विद्याशाखांचे संचालक, अधिकारी सहकाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून ध्वजारोहण केले. त्यानंतर कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे बोलत होते. ते म्हणाले की, विद्यापीठाच्या स्थापनेपासून समाजातील वंचितासह सर्व घटकांना उच्च, व्यावसायिक तांत्रिक शिक्षण घेण्याची संधी दिली जात असल्याचे समाधान आहे. विद्यापीठाचा आज देशातच नव्हे, तर जगात लौकिक वाढत असल्याचे सर्व श्रेय आजपर्यंत काम केलेले कुलगुरू, विद्यापीठ अधिकार मंडळ, संचालक, अधिकारी, विभागीय केंद्र संचालक, अभ्यासकेंद्र प्रमुख सर्व सहकाऱ्यांना देत असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर विद्यापीठाच्या कामगिरीचे चांगले कौतुक होत आहे. विद्यापीठाच्या या प्रगतीत सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांचे भरीव योगदान मिळाल्यानेच आज या विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले असल्याचे ते म्हणाले.
विद्यापीठाची पुढील वाटचाल ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठापुढील आव्हाने, प्रश्न, अडचणींना तोंड देण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
विद्यापीठ आवारात वृक्षारोपण अन‌् स्वच्छता
वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनीही या वेळी सर्वांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. वर्धापनदिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयांत उत्स्फूर्तपणे स्वच्छताही केली. या कार्यक्रमास संचालक, अधिकारी, शिक्षकवृंद आणि कर्मचारी माेठ्या संखेने उपस्थित होते.