नाशिक-महापालिकेने मोठय़ा दिमाखात सुरू केलेला यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून केवळ काही प्रयोगांपुरताच र्मयादित राहिला आहे. सायन्स सेंटरबरोबरच इतरही पूरक उपक्रम सुरू करण्याबाबत अनेकदा बैठकाही झाल्या. मात्र, त्याही कागदावरच राहिल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू केलेला उत्तर महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दुर्लक्षित राहिल्याने विज्ञानप्रेमी नागरिकांकडून, तसेच या क्षेत्रातील जाणकारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्याबरोबर 2 एप्रिल 2014 रोजी यासंदर्भात एक बैठक झाली होती. या बैठकीत चर्चेतून विविध मुद्दे आणि सूचना समोर आल्या होत्या. त्यासाठी महापालिका प्रशासनाने तारांगण समितीच्या सदस्यांना बोलावले होते. मात्र, ही बैठक आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे पडद्याआडच राहिल्याने आजमितीस तारांगणमध्ये केवळ प्रयोग दाखविण्याचेच काम सुरू आहे.
हे दाखवितात प्रयोग
तारांगणमध्ये सध्या विस्मयकारी ब्रॉड, तारे, नवे क्षितिज, मिर्श सम्राटांचे तारे, अंतरिक्षाची सहल, सूक्ष्म लौकिक, भविष्यातील प्राणिजीवन, सृष्टीचा कोप, तार्यांचे जीवनमान, गोष्टी ग्रहणांच्या आदी बारा प्रकारचे प्रयोग प्रेक्षकांच्या मागणीनुसार दाखविले जातात.
निधीसाठी केंद्र सरकार
प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र सरकारचा सांस्कृतिक विभाग, तसेच विज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान त्याचबरोबर मुंबई येथील राजीव गांधी सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी विभागाकडून निधी उपलब्ध करता येणे शक्य आहे. केवळ त्यासाठी सातत्य आणि पाठपुरावा आवश्यक आहे. -अपूर्वा जाखडी, अध्यक्षा, द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स
तारांगणच्या बेसमेंटच्या जागेत आर्ट गॅलरी साकारता येईल, ज्यात सायन्स सेंटर साकारून तेथे विख्यात शास्त्रज्ञ, अभियंत्यांची सचित्र माहिती देता येईल.
नवीन संशोधन केलेल्या व्यक्तींची उपयुक्त माहिती विद्यार्थी व प्रकल्पाला भेटी देणार्यांसाठी देता येणे शक्य.
मुंबईतील नेहरूसायन्स सेंटर, बेंगळुरूचे विश्वेश्वरय्या सायन्स सेंटर, कोलकता येथील बिर्ला सायन्स सेंटर, नागपूर येथील रमण सायन्स सेंटर या केंद्रांशी करार करून नवनवीन प्रयोग राबविणे शक्य.
सोलर सिस्टिम, उपग्रह, ज्योतिषशास्त्र याविषयीची माहिती देणे शक्य.
रोबोटिक्स, एरो मॉडेल्स, पोस्टर स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन भरविणे शक्य.
वीजबचतीच्या अनुषंगाने तारांगणात सोलर पॅनल्स आणि एलईडी बसविणे शक्य.
डायनॉसोर सेंटर, सायन्स लायब्ररी, सायन्स कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविणे शक्य.