आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yashwantrao Chavan:Eka Vadalachi Bakhar, Marathi Film, Divya Marathi

बखरने वाढविले काँग्रेसचे बळ,गुलाब गँगने दिली तालीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रणांगणावर निघण्यापूर्वी सैनिकांना ताजेतवाने करण्यासाठी विविध करमणुकीचे कार्यक्रम आणि तालीम घेतली जायची; तशाच प्रकारची पदाधिकार्‍यांची तालीम सध्या आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. महिलांना प्रेरित करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने ‘गुलाब गॅँग’सारखा चित्रपट, तर कॉँग्रेसजन यशवंतराव चव्हाणांच्या जीवनावर आधारित ‘बखर एका वादळाची’ हा चित्रपट दाखवून आपल्या पक्षाची विचारसणी पदाधिकार्‍यांच्या मनावर खोलवर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रचारापूर्वीच्या तयारीची ही अनोखी रीत यंदा प्रथमच बघायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आणि प्रचाराच्या नियोजनाला देशाच्या सर्वच पातळ्यांवर प्रचंड वेग आला आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या अंगीकृत संघटनांच्या बैठका घेऊन प्रचाराचे नियोजन करत आहेत. राजकीय पक्षांकडून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले हे नियोजन अंतिम टप्प्यात आले असून, येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष प्रचाराचा धुराळा उडायला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आपापल्या पदाधिकार्‍यांना ‘रिफ्रेश’ करण्यासाठी राजकीय पक्षांनीदेखील आता चित्रपट दाखविण्याचे धाटले आहे. त्यासाठी ‘गुलाब गॅँग’ आणि ‘यशवंतराव चव्हाण : बखर एक वादळाची’ या चित्रपटांचा वापर केला जात आहे.
महिलांना प्रेरित करण्यासाठी आणि विशेषत: आजकालच्या अत्याचाराच्या घटनांवर आधारित प्रचार करण्यासाठी गुलाब गॅँग चित्रपट दाखविण्यास पसंती दाखविली जात आहे. एका राजकीय पक्षाने तर काही दिवसांपूर्वी नाशिकरोड येथील चित्रपटगृहात गुलाब गॅँग या चित्रपटाचे सहा खेळ बुक केले होते. महिला पदाधिकारी, युवक, फादर बॉडी अशा वेगवेगळ्या घटकांना घेऊन स्वतंत्रपणे हा चित्रपट दाखविण्यात आला. तसेच यशवंतराव चव्हाणांचे आणि त्या अनुषंगाने कॉँग्रेसचे विचार मनावर बिंबविण्यासाठी कॉँग्रेसच्या वतीने काही पदाधिकार्‍यांना बखर एका वादळाची चित्रपट दाखविण्यात येत आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने कॉँग्रेसला त्याचा फायदा होत असल्याचीही चर्चा आहे. तर, दुसरीकडे काही राजकीय व्यक्ती व प्रवृत्ती यांचा परार्मश घेतलेल्या ‘महागुरू’ या गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटालाही निवडणुकीचा चांगलाच फायदा होत आहे. अर्थात निवडणुकीतील प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या हाती आणखी एक प्रभावी माध्यम सापडले आहे.