आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंधारे फुटले अन् राजापूरचे पाणी तुटले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला - राजापूर.... नाशिकमधील येवला तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांपैकी एक. पहाटे कोंबडा आरवला की इथे लहान मुलांपासून ते घरधन्यापर्यंत सगळ्यांचीच हाताला येईल ते भांडे घेऊन पाण्यासाठी पळापळ सुरू होते अन् दिवस कधी मावळला ते कळतही नाही. इथल्या घराघरातली नित्याची अनेक कामं दररोज मागं पडत राहतात. ती उरकायची कशी याचा विचार करीत गावकर्‍याची रात्रही उलटून जाते अन् दिवस उजाडला की पुन्हा भागमभाग सुरू.... साधारणपणे 25 वर्षापूर्वी इथले दोन्ही बंधारे फुटले अन् तेव्हापासून गावचे पाणी तुटले आहे. आता आशा आहे ती पाण्याच्या टॅँकरची!!
येवला- नांदगाव महामार्गावरच्या या राजापूरची लोकसंख्या सुमारे 8 हजार. या गावासाठी लोहशिंगवे येथून पाणीपुरवठा योजना सुरू केली, परंतु त्याला देखील घरघर लागलीय्. सध्या एका विहिरीच्या पाण्यावर गावाची तहान भागतेय् ती पण सात दिवसांनंतर. त्यामुळे भल्या पहाटे पाणी येण्यापूर्वीच टाकीवर नंबर लावण्यासाठी एकच घाई सुरू होते. घरा-घरातील भांड्यांची जत्रा जणू इथे पाहायला मिळाली, त्यापैकी काही हॅँगरला अनेक कपडे अडकवावेत तशी नळाच्या तोटीवर लटकलेली.... तर काही पाण्याची धार कधी एकदा तोंडात पडेल यासाठी तिष्ठत बसलेली. इथेच कितीतरी घागरी घायाळ झाल्या, किती तरी भांडी जखमी झालीत कदाचित यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. परंतु इथल्या घागरी, बादल्या, पातेले तसंच
इतरही भांड्यांना पडलेल्या लहान-मोठ्या कित्येक खोचा सगळं काही सांगून जातात.
पाण्यासाठी एकच कल्ला
पाणी येताच आपल्या हंड्यात... धड-गळक्या असेल त्या भांड्यात टाकीतले पाणी पडावे यासाठी रस्सीखेच सुरू होते अन् हंड्याला हंडे धडकू लागतात... त्यातच सुरू होतो चिल्या-पिल्यांसह बाये-बाप्यांचा एकच कल्ला.... अन् या कलकलाटाची अखेर दणदणाटात केव्हा झाली ते इतरांना कळत देखील नाही. कारण सगळेचजण घागरभर पाण्यासाठी टाकीवर तर सोडाच, पण सख्खे शेजारीदेखील एकमेकांवर अक्षरश: शत्रूवर तुटून पडावेत तसे तुटून पडलेले पाहिले; अन्, थेंबभर पाण्याचंही मोल किती असतं ते कळलं.
ना योजना, ना पाणी
कुठल्याही पाणी योजनेत किंवा कुठल्या कालवा लाभक्षेत्रात राजापूरचा समावेश नाही, त्यामुळे पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नाही, अशी माहिती भाऊसाहेब वाघ यांनी दिली. जिथे पिण्याच्या पाण्याची ददात तिथे शेती पिकण्याची आशा तरी कशी बाळगायची? जनावरांची तहान तर मोठी असते शेतकर्‍याना साठवून पाणी वापरावे लागतेय्. दोन्ही बंधार्‍याचा प्रश्न सुटला तर पाणीटंचाई नावाला राहणार नाही, असं सीताराम विंचू यांना वाटतं.
पाणीटंचाईने मेटाकुटीला आलेल्या या राजापूरला वडपाटी आणि खैराबाई या दोन बंधार्‍याचा आधार होता, त्यामुळे गावातल्या विहिरींना पाणी कायम रहायचे. परंतु 1988 मध्ये वडपाटीचा तर 85-86 साली खैराबाईचा बंधारा फुटला अन् गावकर्‍याचे हाल सुरू झाले असं सांगताना काशीनाथ घुगे यांनी मोठ्ठा आवंढा गिळला अन् म्हणाले, आज मी 85 वर्षाचा आहे, उभ्या आयुष्यात अशी पाणीटंचाई कधी पाहिली नाही. या बंधार्‍याकडे कोणी लक्ष दिलं नाही, अन् देत पण नाही त्यामुळे एरव्ही आजूबाजूच्या तुडुंब असणार्‍या विहिरी कोरड्या पडल्यात.
राजापूरला पाणी पुरवणार्‍या लोहशिंगवेच्या विहिरीलादेखील कोरड पडतेय, मी हे ऐकत होतो पण लक्षात आलं की, विहिरींप्रमाणेच त्यांचाही घसा सुकलाय्.....अन् माझ्याकडची पाण्याची बाटली पुढं केली ते म्हणाले, ‘बाबा माझं भागंल, पण तुला पुन्हा इथून गावापतूर जायचा हाय, तवा हे जतन कर’. खरंच काशीनाथ घुगे या वाक्यातून खूप काही सांगून गेले. गावकर्‍यानी जर पाण्याचं जतन केलं असतं तर राजापूरचीच नव्हे, तर महाराष्ट्राची होरपळ झाली नसती!!

पाहुण्यांचा धसका...
‘इथे कुणाच्या घरी पाहुणे आले तरी कारभारणीचा जीव धस्स करतो आपल्याच घरची गरज भागवताना नाकी नऊ आलेले अन् त्यात पाहुण्याची सरबराई करणार तरी कशी? पाण्यासाठी तान्ह्या-लहान पोरांकडेही दुर्लक्ष करावे लागते. बाळ मागे लागू नये, म्हणून त्याला घरात कोंडून टाकीवर जावे लागते. भरली घागर आणेपर्यंत रडून-रडून त्याचा घसा सुकून जातो’, असं सांगतांना अलका रमेश नागरे यांचा कंठ दाटून आला.