सिडको - जिममध्ये व्यायाम करताना युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी सिडको भागात घडली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अजिंक्य पांडुरंग लोळगे (वय १९, रा. उत्तमनगर) महाजननगर येथील एका खासगी जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला होता. त्याने तीन दिवसांपूर्वीच जिम सुरू केली होती. व्यायाम करीत असताना त्याला अचानक चक्कर आली. त्यामुळे तो खाली कोसळला. हा प्रकार लक्षात येताच मित्रांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याने या जगाचा निराेप घेतला. अजिंक्य इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. अभ्यासात हुशार असलेल्या अजिंक्यला शरीरसाैष्ठवातही नाव कमवायचे हाेते. मात्र, त्याची सारी स्वप्ने अधुरी राहिली. त्याचे वडील पांडुरंग लोळगे कंपनीत कामगार असून आई अंगणवाडी शिक्षिका आहे. घरात दोन बहिणी एकटाच भाऊ असल्याने तो सर्वांचा लाडका होता.