आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार : मरणासन्न अश्वाला ‘शक्ती’ देणारा पुरुषोत्तम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रस्त्यावर जखमी असलेल्या माणसालाही उचलायला कोणी फारसे तयार होत नसल्याची जेथे सध्याची स्थिती तेथे जखमी वा आजारी प्राण्यांना उचलणे दूरच. परंतु, नाशिकच्या पुरुषोत्तम आव्हाड यांनी अंध अश्वाला घोटीजवळून एका खासगी वाहनात स्वखर्चाने नाशकात आणून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. हा अश्व नाशिकपर्यंत आणताना अनेक विघ्न वाटेत आली. परंतु, त्याच्यावरही मात करीत त्यांनी त्याला जीवनदान दिले. त्यांची ही अनाेखी भूतदया अनेकांना प्रेरणादायी ठरावी अशीच आहे.
घोटीपासून ४० किलोमीटर अंतरावरील देवगाव येथून कारने जाताना पुरुषोत्तम आव्हाड यांची कार रस्त्यात बसलेल्या या बेवारस अश्वाला चाटून गेली. तरीही हा अश्व उभा राहिला नाही. त्यामुळे पुरुषोत्तम यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी लागलीच आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करून हा अश्व उभा का राहत नाही, याचे कारण जाणून घेतले. तेव्हा असे कळले की, तो डाव्या डोळ्याने अंध आहे. त्याचप्रमाणे तो अशक्त असल्याने त्याला लवकर उभे राहाता येत नाही. पुरुषोत्तम यांनी प्रयत्न करून त्याला उभे केले. शेजारीच असलेल्या आश्रमशाळेत मुख्याध्यापिका आहेर यांची परवानगी घेऊन त्याच्यासाठी चारा-पाण्याची व्यवस्था केली. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना ही बाब सांगितली. योगायोगाने त्यांच्या ‘कोणासाठी काहीतरी’ या ग्रुपचा आदिवासींसाठी कपडे आणि मिठाई वाटपाचा उपक्रम दोन दिवसांनंतर राबविण्यात येणार होता. बांधलेल्या अश्वासाठी त्यांनी हा उपक्रम इगतपुरीजवळील आदिवासी पाड्यांवर राबविण्याचे ठरविले. जाताना त्यांनी एक चारचाकी वाहनाची व्यवस्था केली होती. उपक्रम राबविल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा थेट आश्रमशाळेकडे वळविला. तेथून अश्वाला नाशिकच्या कृषी सेवा ट्रस्टच्या गोशाळेत दाखल केले. परंतु, परतीचा प्रवास माेठाच अडचणीचा होता. खराब रस्त्यांमुळे अश्व असलेल्या वाहनाच्या चाकाचे टायर पंक्चर झाले. मोटार मेकॅनिकही जवळ नसल्याने त्यांनी स्वत: टायर बदलले.

सायंकाळपर्यंत अश्व गोशाळेत दाखल झाला. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याला स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून टवटवीत करण्यात आले. या अश्वाची सेवा करून त्याच्यात पुन्हा शक्ती आणण्याचा मानस पुरुषोत्तम यांचा आहे. यासाठी त्यांनी या अश्वाचे नावही ‘शक्ती’ ठेवले आहे.
बातम्या आणखी आहेत...