आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोंगरावर अडकलेल्या शालेय मुलांना वाचवण्यात यश; 1 जण दरीत कोसळून गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- चामरलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेली पाच शाळकरी मुले रस्ता भरकटल्याने डोंगरावरच अडकली. या मुलांना वाचवण्यासाठी गेलेला ट्रेकरही पाय घसरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. साेमवारी (दि. २७) सकाळी वाजेच्या सुमारास चामरलेणी डोंगरावर हा प्रकार घडला. तब्बल सहा तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या पाच मुलांसह दोन्ही ट्रेकरला वाचवण्यात पोलिस दलासह आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दलास यश आले. प्रत्यक्ष डोळ्यासमोर मृत्यू पाहिलेल्या या मुलांना भेदरलेल्या अवस्थेत क्यूआरटीच्या जवानांनी सुखरूप डाेंगरावर घेतल्यानंतर सर्वांच्या जीव भांड्यात पडला. टाळ्यांचा गजर करत पथकांचे नागरिकांसह मुलांच्या पालकांनी अभिनंदन केले. 

 

सिडकोतील केबीएच विद्यालयाचे नयन रोकडे, रोहन शेळके, अादित्य खैरनार, आर्यन गिते सौरभ पाटील हे पाच विद्यार्थी साेमवारी सकाळी सातच्या सुमारास सायकलिंग करत चामरलेणीपर्यंत गेले. सर्वांनी सायकली डोंगराच्या पायथ्याशी लावल्या डाेंगर चढण्यास सुरुवात केली. काही अंतर पार केल्यानंतर त्यांना डोंगरावर जाणारी पायवाट दिसली नाही. त्यामुळे रस्ता भरकटल्याने ते डोंगराच्या डेंजर झोनमध्ये गेले. मात्र खाली उतरताना सर्वांची त्रेधातिरपीट उडाली. जीव वाचवण्यासाठी त्यांनी अारडाअाेरड सुरू केली. याचदरम्यान इव्हन टोकरी ट्रेकर ग्रुपचे सौरभ पाटील, मुकुल जाधव, देवेंद्र जाधव, ऋतुजा धोंगडे अरबेयी शेख यांच्या निदर्शनास हा प्रकार अाला. देवेंद्र अाणि सौरभ हे मुलांना वाचवण्यासाठी खाली उतरले. यातील रोहन शेळकेला वाचवण्यास जात असताना देवेंद्रचा पाय घसरला आणि तो डोंगरावरून वेगाने खाली कोसळला. सौरभने आरडाओरड केल्यानंतर ऋतुजा अरबेयीने त्याला वाचविण्यासाठी आरडाओरड केली. मात्र, उंचावर असल्याने त्याचा खाली आवाज गेला नाही. १०८ रुग्णवाहिका, १०१ नंबर यावर संपर्क साधत त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. आर्यन गिते याला अाई ज्याेती गिते यांचा फाेन अाल्याने त्याने अापण डोंगरावर अडकल्याची माहिती देत अाम्हाला वाचव, असे सांगितले. ज्याेती गिते यांनी तत्काळ केबीएच शाळेच्या शिक्षकांशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. शिक्षकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ही बाब पोलिसांना कळवली. तोपर्यंत म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पथक, क्यूआरटी पथक, अग्निशामक दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध बचाव पथक दाखल झाले. या पथकांनी डोंगरावर चढून दोरीच्या साह्याने पाच मुलांसह ट्रेकरला वाचवले. 

 

फोन केल्याने समजले 
आर्यन सकाळी सायकलिंग करतो. शाळेत जाण्याची वेळ झाल्याने त्याला फोन केला. तेव्हा तो डोंगरावर अडकल्याची माहिती मिळाली. त्यास धीर देत शिक्षकांना हा प्रकार सांगितला. सुदैवाने तत्काळ मदत मिळाल्याने सर्व मुले वाचली. 
- ज्योती गिते, आर्यन गितेची आई 

 

अनुभव चित्तथरारक... मुले वाचल्याने आनंद 
डोंगरावर काही मुले अडकल्याचे दिसताच त्यांना धीर दिला. डोंगरावरील गवतावर दव पडल्याने पाय घसरत होते. पण मुलांना वाचवणे महत्त्वाचे होते. मुलांपासून काही अंतरावर पाय घसरल्याने देवेंद्र खाली पडला. त्यास वाचवण्यासाठी जात असताना माझाही पाय घसरला. सुदैवाने दगडाला धरल्याने मी वाचले आणि अडकलेल्या मुलांना धीर दिला. यापूर्वी ट्रेकिंग करताना अडकलेल्या व्यक्तींना वाचवले आहे.
- सौरभपाटील, इव्हन टोकरी ट्रेकिंग ग्रुप 

 

चुकलेल्या रस्त्यामुळे प्रत्यक्ष पाहिला मृत्यू 
डोंगरावर चढतानाकाही वाटले नाही. मात्र, खाली उतरताना पायवाट चुकल्याने डोंगराच्या निमुळत्या रस्त्यावरून जात असताना सरकत खाली आलो. ट्रेकिंग करणाऱ्या दोन मुलांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यातील एक खाली पडल्याने भीती अधिक वाढल्याने साक्षात मृत्यूच पुढे उभा असल्याचे जाणवले. 
- नयन रोकडे, वाचलेला विद्यार्थी 

 

आईचा फोन आल्याने वाचलो... 
डोंगरावरूनउतरताना गवतावरून पाय घसरल्याने कोसळलो, गवत आणि दगडला पकडून राहिलाे. जीव वाचवण्यासाठी आरडाअाेरड करत मनातून अाईचा धावा करत हाेताे. आवाज एेकून एक दादा वाचवण्यासाठी आला. त्याने मित्र रोहनला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र या दादाचा पाय घसरल्याने तोही खाली पडला. त्याचा मित्र त्यास वाचवण्यास जात असताना खाली कोसळला. याचवेळी आईचा फोन आला. तिला घडलेला प्रकार सांगितला असता तिने धीर दिला घाबरू नकोस, असे म्हटल्याने दगडाला घट्ट पकडून राहिलाे. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी दोरीच्या साह्याने वर घेतल्याने वाचलो, असे आर्यन गिते याने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. 

 

वेलडन बॉइज.....वेलडन 

डोंगरावर मुले अडकल्याची माहिती मिळताच तत्काळ क्यूआरटी, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि म्हसरूळ पोलिसांचे पथक दाखल झाले. सर्वांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत डोंगरावर चढाई केली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी तीनही पथकांना याेग्य सूचना दिल्या. रेस्क्यू ऑपरेशन फत्ते झाल्यानंतर सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी आयुक्तांना ऑपरेशन फत्ते झाल्याची माहिती दिली असता डॉ. सिंगल यांनी वेलडन बॉइज म्हणत पथकाचे अभिनंदन केले. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...