आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकच्या युवकाचे खंडणीसाठी अपहरण, पोलिसांकडून शिताफीने सुटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक । सुमारे तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी नाशिकमधील सराफी व्यावसायिकाच्या मेहुण्याचे अपहरण करणार्‍या पुण्यातील सराफा व्यावसायिकासह चौघांना जेजुरी येथे अटक करण्यात गुन्हा शोध पथकास यश आले आहे. पथकाने अपहृत अमित पिंगळेची सुखरूप सुटका केली.
अमितचे (वय 26, रा. पाटील लेन नंबर तीन, कॉलेजरोड) शनिवारी रात्री त्याच्या घराजवळून पाच जणांनी अपहरण केले होते. सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल नारायण लाडगावकर (रा. पाटील लेन) यांचा आशापुरा एफईझेड येथे कारखाना आहे. त्यांचा सोने-चांदीचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, ते दक्षिण आफ्रिकेतून सोने खरेदी करून दुबई व इतर देशांत विकतात. या व्यवसायातूनच त्यांची पुण्यातील ज्योतिषी व सराफी व्यापारी सुबोध पटवर्धन यांच्याशी ओळख झाली होती. पटवर्धन यांच्याकडून काही किलो सोने व दीडशे किलो चांदीचा खरेदीचा व्यवहार झाला होता.
या मोबदल्यात काही रक्कम रोखीने देऊन उर्वरित रकमेचे 50 लाखांचे दोन धनादेश पटवर्धन यांना दिले होते. मात्र, त्यातील एक न वटल्याने पटवर्धन यांनी लाडगावकर यांच्यासह त्यांची पत्नी राखी व मेहुणा अमित पिंगळे यांच्याकडे तगादा लावला होता. कायदेशीर नोटीसही दिली होती.

असे झाले अपहरण : अमोल यास पटवर्धनने फोन करून बोलावून घेतले. गप्पा मारत असतानाच चार जणांच्या मदतीने मोटारीत टाकून पळवून नेले. पुण्याजवळ एका खोलीत डांबून ठेवत त्याची बहीण राखी व कुटुंबीयांकडे तीन कोटींची मागणी केली. पैसे न दिल्यास त्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. वारंवार मोबाइलवर संपर्क साधत रक्कम घेऊन सोमवारी दुपारी जेजुरी येथे मंदिराच्या आवारात बोलावण्यात आले. राखी लाडगावकर यांनी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांना घटना सांगितली. आयुक्त सरंगल यांनी शिंदे व भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले, सहायक निरीक्षक भगवान मथुरे, गुन्हा शोध पथकाच्या युनिट तीनला सूचना दिल्या.

मोबाईल कॉलवरून लागला शोध : मोबाइल कॉलचे विश्लेषण व त्याद्वारे लोकेशन मिळवून दोन-तीन ठिकाणी सापळे रचण्यात आले. सकाळपासूनच जेजुरी पोलिसांच्या सहकार्याने सापळा रचला असता लाडगावकर कुटुंबीयांनी ठरल्या जागी संशयितांना पैसे देताच पोलिस आल्याचा संशय आल्याने संशयितांनी काही न बोलताच पळ काढला. मात्र, पोलिसांनी मोटारीचा पाठलाग करीत ताब्यात घेतले. पटवर्धन याच्यासह रवींद्र मोरे, महेंद्र काकडे, मनोज मोरे, मारुती सोनवणे (रा. पुणे) यांना अटक केली. अमितची सुखरूप सुटका केली.

आयुक्तांकडून गौरव : आयुक्त युक्त सरंगल यांनी पथकातील सहायक आयुक्त गणेश शिंदे, सहायक निरीक्षक भगवान मथुरे, हवालदार श्रीराम पाळदे, मुरकुटे, मुक्तार पठाण, सोमनाथ सातपुते, शरद खैरनार, राजाभाऊ गांगुर्डे, राजेंद्र जाधव आदींच्या पथकाच्या कामगिरीचे अभिनंदन करीत गौरव केला.

शाकाल उर्फ डॅनीचा शोध : संशयित सुबोध पटवर्धन यांच्या सांगण्यानुसार गुन्ह्यात मुख्य सूत्रधार सराइत गुन्हेगार शाकाल ऊर्फ डॅनीचा (रा. फलटण) सहभाग असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तेथे तळ ठोकून आहे. त्यास रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे वृत्त असून या गुन्ह्यात आणखी काहींचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी अमोल लाडगावकर यांना बोलावले असून ते दक्षिण आफ्रिकेतून नाशकात येण्यासाठी निघाल्याचे सांगण्यात आले.