आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाला हाे म्हण, अाज फक्त पाणी फेकले, पुढच्या वेळी अॅसिड फेकेन; शाळकरी मुलीला बसमध्ये घुसत धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एका सोळा वर्षीय शाळकरी मुलीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकृत माथेफिरूने शाळेची बस अडवून तिच्या तोंडावर बाटलीतील पाणी फेकत ‘तू हो म्हण, यावेळी पाणी फेकले, पुढच्या वेळी तोंडावर अॅसिड फेकेन,’ अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने शहरातील पालकांमध्ये मुलींच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत अाहे.
 
पोलिसांची जरब कमी होत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींचे फावत असल्याची संतप्त भावनाही शहरात सर्वत्र पसरली अाहे. गुरुवारी (दि. १४) सकाळी ६.३० वाजता म्हसरूळ परिसरातील वडनगर येथे हा प्रकार घडला. या प्रकारामुळे पीडित विद्यार्थिनी प्रचंड भेदरली अाहे. म्हसरूळ पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रेमवीराला अटक करण्यात अाली अाहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरीरोड परिसरात राहणारी ही मुलगी मेरी-रासबिहारी राेडवरील एका प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेच्या शाळेत दहावीत शिक्षण घेत अाहे. परिसरातील संशयित संजय शेरसिंग करणसिंग एेर (रा. बोरगड) तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. 

पीडित मुलीच्या घरच्यांनी ‘तिला त्रास देऊ नको’, असे या युवकाला समजावूनही सांगितले होते. गुरुवारी सकाळी पीडित मुलगी शाळेच्या बसमधून जात असताना संशयिताने ही बस अडवली चालकास दमदाटी करत ताे बसमध्ये शिरला. सीटवर बसलेल्या पीडितेच्या तोंडावर काचेच्या बाटलीतील पाणी फेकले ‘तू हो म्हण, नाही तर पुढच्या वेळेला तोंडावर अॅसिड फेकेन,’ अशी धमकी देत तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. या प्रकारामुळे घाबरून गेलेल्या मुलीने ही घटना आई-वडिलांना सांगत म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत संशयिताच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत (लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण) गुन्हा दाखल करून त्याला राहत्या घरी अटक केली. 
 
सुरक्षेच्या उपाययाेजना नाहीत : शहरातील काही शाळा सोडल्यास बहुतांश शाळांमध्ये सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही आदी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आहे. शालेय वाहतूक करणाऱ्या बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कुठलेही ठोस उपाय नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले अाहे. 
 
संशयिताने यापूर्वीही दिली हाेती धमकी : संशयित पीडित मुलीच्या शेजारी राहणारा आहे. वाडीवऱ्हे येथे खासगी कंपनीत ताे कामाला आहे. काही दिवसांपासून तो या मुलीला त्रास देत होता. वेगवेगळ्या मोबाइलवरून फोन करत ताे तिला त्रास देत होता. अाता तर त्याने अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याने मुलीसह तिचे कुटुंबीय भयग्रस्त अाहेत.

शालेय वाहतूक असुरक्षित 
शालेयवाहतुकीच्या कंत्राटी बसला आडवे होत थेट बसमध्ये शिरून मुलीच्या तोंडावर पाणी फेकत अॅसिड फेकण्याची धमकी या माथेफिरू युवकाने दिली. विशेष म्हणजे, बसचालकासमोर हा प्रकार घडूनही तो गप्प राहिला. बसमध्ये काळजीवाहक (अटेंडंट) नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बसमधून राेज शाळेत जाणाऱ्या इतर मुलींमध्ये या प्रकाराने प्रचंड दहशत पसरली आहे. बसमध्ये पोलिस हेल्पलाइन नंबरही नसल्याचे पोलिसांनी निदर्शनास अाणून दिले. 
 
पालकांनी रहावे सजग 
पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या नेहमी संपर्कात रहावे. मुलींच्या अडचणी जाणून घ्याव्यात. मुलींनीही अापल्याला होणाऱ्या त्रासाबाबत पालकांशी मनमोकळेपणे बोलावे; जेणेकरून संबंधितांवर कारवाई करणे शक्य होईल. त्यामुळे अशा प्रकारांना ताेंड देण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. 

दिव्य मराठी भूमिका 
दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेची शालेय वाहतूक करणारी बस कुणी विकृत अडवताे, चालकही खुशाल बस थांबवून गंमत पाहत बसताे अाणि माथे फिरलेला ताे तरुण मुलीच्या ताेंडावर पाणी फेकत ‘पुढच्या वेळेस अॅसिड फेकेन’, अशी धमकी देऊन थाटात निघून जाताे... हा प्रसंग एखाद्या भडक दाक्षिणात्य चित्रपटातला नसून तीर्थक्षेत्र पंचवटीत घडला अाहे. पाेलिसांचा संपलेला धाक अाणि संस्थेत शिकणाऱ्या मुलींच्या संरक्षणाबाबतची व्यवस्थापनाची बेपर्वाईच यातून सिद्ध झाली अाहे. यामुळे पालक चिंतेत पडणे स्वाभाविक अाहे. मुलींच्या शिक्षणाला प्राेेत्साहन देणाऱ्या पालकांनी अशा प्रकारांमुळे सुरक्षिततेपाेटी मुलींना घरी ठेवण्याचा विचार केला तर ते समाजाचे माेठेच अपयश ठरेल. म्हणूनच या प्रसंगाकडे ‘शांत, सुसंस्कृत शहरात अभावानेच घडणारी घटना’ म्हणून पाहणे भविष्यासाठी धाेक्याचे ठरेल. त्यातून विकृत प्रवृत्तींचेही फावत जाईल. अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी जनमत एकवटण्याकरिता ‘दिव्य मराठी’ कटिबद्ध अाहे. 
बातम्या आणखी आहेत...