नाशिक - एरवी स्वत:चे किंवा फार तर आई-वडिलांचे अवयव मृत्यूनंतर दान करणे तसे समाजासाठी नवे नाही. पण, काळजाचा तुकडा असलेल्या 13 वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर प्रचंड दु:खाघात झालेल्या आई-वडिलांनी त्यातून सावरत गरजूंना त्याचे अवयव प्रत्यारोपणासाठी दान देण्याचा निर्णय घेणे तसे दुर्मिळच! आरोग्य विज्ञान विद्यापीठातील वरिष्ठ सहायक युवराज भारंबे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलगा अपूर्वच्या अपघाती मृत्यूनंतर त्याचे डोळे आणि किडनी दान करून मानवतेचा नवा आदर्श घालून दिला.
जन्मदात्यांवर आभाळ कोसळले : नववीत गेलेला मुलगा आकस्मिक गेल्याने ते दु:ख जन्मदात्यांना सहन होण्यापलीकडचे होते. मात्र, या काळजाच्या तुकड्याची आठवण प्रत्यक्ष रूपात जिवंत राहावी म्हणून आई कविता आणि वडील युवराज यांनी काळजावर दगड ठेवत अपूर्वचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. स्वयंसेवी संस्थांना त्वरेने त्याची कल्पना देत त्यांनी अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. या संस्थेने तपासणी केल्यानंतर त्याचे दोन्ही डोळे आणि एक किडनी त्यासाठी उपयोगी असल्याचे सांगण्यात आले. भारंबे कुटुंबाने त्यास तातडीने मान्यता देत समाजापुढे एक आदर्श घालून दिला.
झाडावरून पडला आणि..
गंगापूररोडवरील दादोजी कोंडदेवनगर येथील भारंबे यांचा मुलगा अपूर्व 1 मे रोजी परीक्षेचा निकाल लागल्याच्या आनंदात निर्मला कॉन्व्हेंटशेजारील उद्यानात खेळायला गेला. तेथे जांभळाच्या झाडावरून पडल्याने त्याच्या यकृताला मार लागला. हृषिकेश हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अपूर्वला वाचवण्यासाठी दोन दिवस अथक प्रयत्न केले. त्यासाठी मुंबईहून विशेष तज्ज्ञांचे पथकही बोलावण्यात आले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. यकृत निकामी झाल्याने आणि मेंदूतील गाठींमुळे 3 मे रोजी अपूर्वचे निधन झाले.