आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘युवान’ची रस्त्यावरची शाळा, अभ्यासाचा लावी लळा..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुणा एका युवकाच्या मनात रस्त्यावर फिरणारे मूल पाहून त्याच्या हातात पाटी-पुस्तक देण्याची कल्पना येते. मग एकाच्या हाती पाटी-पुस्तक पाहून चार मुले जोडली जातात. अशी बनत जाते ‘युवान’ची साखळी... युवावर्गाने चालविलेला हा उपक्रम वाऱ्याच्या वेगाने पसरत जातो. युवांची शाळा म्हणून ‘युवान’ असे नाव दिले गेले. महाविद्यालयीन युवकांनी एकत्र येऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वस्तीत जाऊन शाळा सुरू केली.

या शाळेचा मुख्य उद्देश म्हणजे शाळेत जाऊ शकणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणे. ‘युवान’च्या सध्याच्या कामाचे स्वरूप पाहता अंबिकानगर झोपडपट्टीमध्ये आणि आसपासच्या परिसरातील रस्त्यांवर राहाणाऱ्या मुलांसाठी ही शाळा सुरू आहे. १२ युवकांचा एक गट अंबिकानगर येथे काम करतो आहे. वस्तीतील ते १२ वर्षे वयोगटाच्या मुलांना रोज दुपारी ते या वेळात या १२ पैकी काही लोक जाऊन प्रत्यक्ष शिकवतात. याच युवकांनी तयार केलेला अभ्यासक्रम ही मुले शिकतात, ज्यामध्ये इंग्रजी मुळाक्षर, नाती ओळखणे, स्वच्छतेच्या सवयी, साबणाचा वापर, चांगल्या सवयी शिकवल्या जातात. वस्तीतली सध्या ४० मुले यांच्यासोबत शिकतात. ‘युवान’तर्फे युवादिनी या मुलांच्या विविध भावमुद्रांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामागे समाजातील प्रत्येक घटक त्यांच्याशी जोडला जावा, हा उद्देश अाहे. ‘युवान’च्या कार्यकर्त्यांनी या मुलांना शाळेत भरती करण्याचा ध्यास घेतला आहे. कोणत्याही मुलाला सरळ इंग्रजी शिकवायला घेतले तर त्याला अभ्यासाची भीती वाटेल म्हणून ‘युवान’ या मुलांसाठी अभ्यासक्रमाची आखणी करतात त्यानुसार त्यांना शिक्षण दिले जाते. त्यांची मानसिक तयारी केली जाते, मग ही मुले स्वत:हून शाळेत जाण्यास तयार होतात.

स्वच्छतेची सवय
एखाद्यावस्तीमध्ये फळा, साबण आणि चटई घेऊन जायचे. चटई टाकण्यासाठी स्वच्छतेची सवय लावायची. स्वच्छतेसाठी हात धुण्याची सवय लावायची. अक्षर ओळखीसाठी फळा हाताळण्यास प्रवृत्त करायचे अशा लहानसहान गोष्टींमधून ‘युवान’कडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, स्वत: बनविलेल्या अभ्यासक्रमाचा वापर करून या मुलांना युवक शिकवत आहेत.

छायाचिद्ध: ‘युवान’ या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या अंबिकानगर येथील शाळेत सुरू असलेला ज्ञानयज्ञ.