आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zakir Husen And Rashid Khan's Program Issue At Nashik

नाशकात शुक्रवारी उस्ताद’, झाकीर हुसेन यांचे तबलावादन; राशीद खॉँ यांचे गायन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाचा आस्वाद नाशिककरांना 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता केटीएचएम महाविद्यालयाच्या बोट क्लब येथे घेता येणार आहे. या ‘वाह उस्ताद’ मैफलीत लोकप्रिय गायक राशीद खॉँ हेदेखील आपल्या रामपूर घराण्याची गायकी रसिकांसमोर सादर करणार आहेत. पुण्यातील व्हायोलिन अकादमी, नाशिकातील लिसनर्स ग्रुप ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार असून ‘दिव्य मराठी’ माध्यम प्रायोजक आहे.

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य व्हायोलिन अकादमी आणि लिसनर्स ग्रुप ऑफ नाशिक करीत आहे. यासंस्थांतर्फे नुकतेच होरायझन अकादमीच्या मैदानात स्वरझंकार महोत्सव रंगला होता. 7 फेब्रुवारी होणार्‍या सायंकालीन मैफलीमध्ये आजच्या पिढीतील लोकप्रिय गायक राशीद खॉँ यांना संवादिनीवर अजय जोगळेकर, तर तबल्यावर पं. विजय घाटे साथ सांगत करणार आहेत. उत्तरार्धात तबला या वाद्याला सार्‍या विश्वामध्ये लोकप्रियता मिळवून देणारे आणि आपल्या बोटांच्या जादूने दुनियेला वेड लावणारे उस्ताद झाकीर हुसेन हे तबला वादनाची मेजवानी देणार आहेत. त्यांना साथ उस्ताद दिलशाद खॉँ (सारंगी ) हे देतील. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन लिसनर्सचे अँड. नितीन ठाकरे, प्रदीप सराफ, योगेश हिरे, राजस उपाध्ये, प्रताप सराफ, प्रकाश पगारे यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी 8975003213 किंवा 8975003222 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

येथे मिळतील प्रवेशिका
‘वाह उस्ताद’ मैफलीच्या प्रवेशिका जहागिरदार बेकर्स, कॅनडा कॉर्नर, एम. जी. रोड, बिटको पॉइंट नाशिकरोड, महात्मानगर तसेच, कालिदास कलामंदिर, शालिमार, पु. ना. गाडगीळ अँण्ड सन्स, कॉलेजरोड आदी ठिकाणी उपलब्ध होतील.

दिग्गजांच्या मैफलींचे सातत्याने आयोजन
व्हायोलिन अकादमीतर्फे गेल्या चार वर्षात पं. शिवकुमार शर्मा (संतुर) व हरिप्रसाद चौरसिया (बासरी), शाहीद परवेझ (सतार), पं. अतुलकुमार (व्हायोलिन), पं. विश्वमोहन भट (मोहनवीणा), पं. शिवमणी (विविध तालवाद्य), पं. प्रभाकर जोग (गाणारे व्हायोलिन) अशा विश्वविख्यात वादकांबरोबर पतियाळा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका बेगम परविन सुलताना व जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पं. अश्विनी भिडे- देशपांडे, किराणा घराण्याचे तरुण गायक आनंद भाटे यांच्या गायनाचेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती व परंपरा यांचा वारसा पुढच्या पिढीमध्ये वृद्धिंगत व्हावा यासाठी अकादमीतर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे अकादमीचे संचालक अतुलकुमार उपाध्ये यांनी सांगितले.