नाशिक- वातावरणातील बदलामुळे शहरात साथीच्या विकारांनी डोके वर काढले असून, विविध रुग्णालयांत रुग्णांची गर्दी होते आहे. जुने नाशिक भागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या ३० दिवसांत तब्बल साडेआठ हजार रुग्णांनी तपासणी केली असून, यात तीन हजार हजार महिलांचा समावेश आहे. ही रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
वातावरणातील बदलामुळे साथीच्या विकारांत वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. पावसाळ्यात साथीचे विकार पसरण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रभावी उपाययोजना करणे अपेक्षित होते. काही दिवसांपासून जुने नाशिक भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे काविळीच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. जुन्या नाशकातील नानावली, कथडा, कुंभारवाडा, अमरधामरोड, भीमवाडी आदी भागात काविळीचे रुग्ण आढळले आहेत. . झाकीर हुसेन रुग्णाल्यात उलट्या, जुलाब, टायफॉइड, अतिसार, अचानक ताप येणे अादी विकारांचे तब्बल आठ हजार हजार ६४६ रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले आहे. यात सर्वाधिक संख्या कावीळ आणि टायफॉइडच्या रुग्णांची आहे. खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर छातीवर सूज येणे या विकाराच्या रुग्णांची संख्याही मोठी असल्याची माहिती डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली. दरम्यान, जलकुंभामध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत नसल्याने, तसेच धूरफवारणीही होत नसल्याने विविध विकारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे याबाबत त्वरित अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
पहिलांदाच एवढे रुग्ण
काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात रुग्णांचा आकडा आठ हजारांवर गेला आहे. डॉ.राजेंद्र भंडारी, मुख्यवैद्यकीय अधिकारी, डॉ. हुसेन रुग्णालय