आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायखेडा पोलिसांची धडक कारवाई, 2 लाख 75 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जायखेडा पोलिसांनी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत २ लाख ७५ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी विनापरवाना बेकायदा मद्य वाहतूक करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 4 जणांना मुद्देमालासह अटक केली आहे.
   

कोर्टाच्या आदेशान्वये गेल्या काही दिवसांपासून महामार्गा लगतची अनेक दारू दुकाने बंद असल्याने जादा नफा कमविण्याच्या उद्देशाने अवैध मद्य विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. यावर अंकुश आणण्यासाठी जायखेडा पोलिसांनी कंबर कसली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड व पोलीस उपनिरीक्षक गणेश गुरव यांनी धडक कारवाई करत देशी विदेशी व गावठी दारूची अवैध विक्री रोखण्यासाठी कडक मोहीम हाती घेतली आहे.
 
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सटाणा ताहाराबाद रोडवरील हॉटेल शाहू समोर सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचुन ही कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी विनापरवाना मद्याची वाहतुक करणाऱ्या इंडीगो कारमधून विदेशी कंपनीचा जवळपास २ लाख रुपये किंमतीचा मद्य साठा जप्त केला. हा मद्यसाठा धुळे जिल्ह्यातून बागलाण तालुक्यात विक्रीसाठी आणण्यात आला होता. याप्रकरणी धुऴे जिल्ह्यातील मुंगटी येथील विकी कैलास भामरे, भूषण भिकन पाटील व बोराडी येथील राजेश विश्वास पावरा या तिघांना अटक करण्यात आली.

याच पाठोपाठ पोलीस निरिक्षक विजय ठाकूरवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुल्हेर विरगाव रस्त्यावरील मुंगसे गावाजवऴ दुसरा सापळा रचून मारूती क्र. एम एच ०४ वाय ४४९४ या गाडीतून ७५ हजार रुपये किमतीची देशी दारू व रोख रक्कम हस्तगत केली. या कारवाईत दारूची अवैध वाहतूक करणारा उद्धव सोनवणे रा. मुल्हेर यास पोलीसांनी अटक केली. त्‍यांच्‍यावर मद्याची विना परवाना अवैध वाहतूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अप्पर पोलीस अधिक्षक शशीकांत शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय ठाकूरवाड, पोलीस उपनिरिक्षक गणेश गुरव, पोलीस कर्मचारी सोनवणे, बोडखे, थैल, गायकवाड, खैरनार, सावऴे, माऴी आदीनीं ही कारवाई केली.
 
बातम्या आणखी आहेत...