आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेच्या 72 पैकी दहा सदस्य निफाड तालुक्यातून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निफाड - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकांच्या निमित्ताने आपापली शक्तीपणाला लावून जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता मिळविण्याची गणिते मांडू लागले आहेत. कॉँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप या प्रमुख पक्षांच्या आपापल्या पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणा-या इच्छुक उमेदवारांची चाचपणी पूर्ण केली आहे.
जिल्हा परिषदेच्या 72 सदस्यांपैकी सर्वाधिक दहा सदस्य निफाड तालुक्यातून निवडले जातात तर निफाड पंचायत समितीमध्ये देखील जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे 20 सदस्य 20 गणांमधून निवडले जात असतात.
यंदा जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये जिल्हा परिषदेत निफाड तालुक्यातील सर्व 10 ही गट हे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून, त्यापैकी नऊ जागा या महिलांच्या वाट्याला गेल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्या सर्वच मातब्बर इच्छुकांच्या आशा अपेक्षा धुळीत मिळाल्या आहेत. ज्या ठिकाणी इतर मागास प्रवर्गातील महिलांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. माझ्या ठिकाणी मी नाही तर माझी पत्नी तरी असावी असा घाट अनेक नेतेमंडळींनी घातलेला आहे.
तशीच काहीशी अवस्था पंचायत समितीमध्येही दिसत आहे. या निवडणुकीमध्ये 20 गणांपैकी 15 गण हे विविध प्रवर्गांसाठी राखीव ठरले असून, केवळ पाचच गण हे सर्व खुले आहेत. त्यामुळे या गणांमध्ये निवडणुकीची धामधूम इतर ठिकाणांपेक्षा जास्त दिसण्याची चिन्हे आहेत. या पाच गणात करंजगाव पिंपळगाव बसवंत, लासलगाव, विंचूर, कोठुरे यांचा समावेश आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निफाड पं.स.च्या 20 सदस्यांपैकी सात सदस्य राष्ट्रवादी कॉँग्रेसचे, सहा सदस्य कॉँग्रेसचे सहा सदस्य शिवसेनेचे आणि एक सदस्य भाजपचा अशी विभागणी होती. यंदा मात्र गणित बदलणार असा कयास व्यक्त केला जात आहे. भाजप- शिवसेना नेहमीप्रमाणे एकत्र लढणार असले तरी नाराज कार्यकर्ते काय करणार हा प्रश्न आहे. त्यांच्यातच रिपाइंच्या रूपाने जागा वाटपात अजून एक वाटेकरी निर्माण झाल्याने जागा वाटपाचे त्रांगडे त्यांना त्रास देणार यात शंका नाही. महाराष्ट्रनवनिर्माण सेनेकडून देखील या निवडणुकीत काही जागांवर दावा सांगण्यात येत आहे. दुसरीकडे कॉँग्रेस, आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये अद्यापपर्यंत कोणताही समझोता झालेला नसल्याने दोन्ही पक्ष निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. निफाड तालुक्यातील 42 गावेही पालकमंत्री छगनराव भुजबळांच्या येवला मतदार संघात समाविष्ट असल्याने भुजबळ फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष करून देवगाव, विंचूर लासलगाव या परिसरात त्यांचा परिणाम जास्त जाणवणार आहे.
गेल्या वेळेस आ. अनिल कदम, भास्करराव बनकर, राजाभाऊ शेलार, राजाभाऊ पानगव्हाणे यांचीएकजूट होती मात्र मध्यंतरी घडलेल्या काही राजकीय घडामोडींमुळे ही एकजूट भंग पावल्याचे दिसत आहे. एकंदरीत ही निवडणूक आता केवळ एक महिन्यावर येऊन ठेपलेली असताना देखील निफाड तालुक्याच्या राजकारणातील संभ्रमावस्था कायम असल्याचे दिसत आहे.