आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय पक्षांना शोध सक्षम उमेदवाराचा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - आमदार माणिकराव कोकाटे यांची राजकीय कारकीर्द ज्या शहा गटाने घडविली त्याचे आता देवपूर असे नामकरण झाले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या गटावर आमदार कोकाटे यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यांच्या या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी अनेक डावपेच वापरले जाऊनही गड मजबूत असल्याने विरोधकांचे सर्वच अस्र निष्प्रभ ठरत आहे.
मात्र, याच देवपूर गटात विधानसभा निवडणुकीत कोकाटे यांना मिळालेले मताधिक्य अगदीच कमी होते. विरोधी उमेदवार प्रकाश वाजे यांना या गटातून सागर जाधव या कार्यकर्त्याने मिळवून दिलेले मते कोकाटेंना आत्मपरीक्षण करायला लावणारे होते. त्यामुळे या गटाच्या निवडणुकीवर कोकाटे यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
देवपूर गटावर आरक्षणाची संक्रात आल्याने बांधकाम सभापती अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके यांचे पुन्हा जिल्हा परिषदेत निवडून जाण्याचे मनसुबे उधळले गेले आहे. अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी हा गट राखीव झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरू पाहणा-यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. गतवेळी जिल्हा विकास आघाडीकडून सिन्नरस्थित अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून आर. जे. थोरात, शिवसेनेकडून रामनाथ नाजगड यांच्यात लढत झाली. कोकाटे देतील तो उमेदवार विजयी करण्याची परंपरा गटाने त्यावेळी पार पाडली. त्यांचा शब्द शिरसावंद्य मानणा-या मतदारांनी चव्हाणके यांना मोठ्या मतांच्या फरकाने विजयी केले. पुढे चव्हाणके कोकाटे यांच्या राजकीय पाठबळाच्या जोरावर बांधकाम सभापतीही झाले. या वेळी आमदार कोकाटे कॉँग्रेसमध्ये विसावल्याने जिल्हा परिषदेचा हा गट ताब्यात ठेवण्यासाठी सज्ज झाले आहे, तर विरोधक खिंडार पाडण्याची रणनीती आखत आहे.
2001 च्या जनगणनेनुसार
37 हजार लोकसंख्या
2001 साली झालेल्या जनगणनेनुसार या गटातील 24 गावांची मिळून 37 हजार 206 एवढी लोकसंख्या आहे. त्यात देवूपर, पंचाळे, सोमठाणे, सांगवी, शहा या गावांची लोकसंख्या अडीच हजारावर आहे. या मोठ्या गावांतील उमेदवार दिला की तो विजयी होतो, असा या गटाचा इतिहास आहे. मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या या गटात अनुसूचित जातीची 3025, तर जमातीची 3782 एवढी लोकसंख्या आहे. भिल्ल, ठाकर आणि महादेव कोळी यापैकी एका समाजाचा उमेदवार देण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांची तारेवरची कसरत सुरू आहे.
इच्छुक उमेदवार - आमदार कोकाटे यांच्यानंतर सोमठाणे गावातून प्रथमच जिल्हा परिषदेसाठी अन्य कुणाला उमेदवारी करण्याची संधी चालून आली आहे. गट जमातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने सोमठाणे गावच्या सरपंच ताईबाई गोरख गायकवाड यांची उमेदवारी कोकाटे यांनी कॉँग्रेसकडून निश्चित केली असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून पाथरे येथील ज्योती शिवाजी माळी यांचे नाव पुढे येत आहे. मनसे, शिवसेना दोघेही उमेदवारांच्या शोधात असून, उमेदवार मिळाला तर कागदपत्रांची अडचण येत असल्याने या पक्षांपुढे उमेदवार देण्यासाठी अडचणीचे डोंगर उभे आहेत.