आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका शाळांमधील संगणक धूळखात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शालेयस्तरापासून विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान असावे, यासाठी शासनातर्फे सर्वशिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक शाळेला संगणक देण्यात आलेले आहेत. मात्र, योग्य नियोजनाअभावी महापालिकेच्या शाळांना देण्यात आलेले संगणक धूळखात पडल्याची स्थिती आहे.

महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये प्रशिक्षकच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिक्षण विभागातर्फे ठरलेल्या अर्टी-शर्तींनुसार सुरुवातीस काही प्रशिक्षकांची नेमणूक फॅन्सी टेक्नॉलॉजी या संस्थेने केली होती. मात्र, केवळ दोन-तीन महिनेच या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर प्रशिक्षक व संस्था यांच्यात पगारवरून वाद झाला. त्यामुळे प्रशिक्षकांनी शाळेवर जाणे बंद केल्याने विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणच बंद झाले आहे. त्यामुळे हा उपक्रमच अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

कोट्यवधींचा खर्च पाण्यात
महापालिकेतर्फे संस्थेला सुमारे दीड कोटीचे कंत्राट देण्यात आले होते. त्यातील अर्धे बिलही अदा करण्यात आले आहे. मात्र, संगणक मिळूनही केवळ प्रशिक्षकांअभावी संगणक तसेच पडून आहेत. त्यामुळे त्यासाठी करण्यात आलेला खर्च व्यर्थ गेला आहे.

पाठपुरावा करीत आहोत
प्रशिक्षक व शिक्षकांची आवश्यकता आहे. कारण, जोपर्यंत शिक्षक संगणक प्रशिक्षण घेत नाहीत, तोपर्यंत ते विद्यार्थ्यांना शिकवू शकणार नाहीत. यासंदर्भातील फाइल आयुक्तांकडे दिलेली आहे. एन. पठाण, अधीक्षक, शिक्षण मंडळ

प्रशिक्षक, शिक्षकांची मागणी
मौलाना आझाद शाळा क्रमांक 10 मध्ये फक्त दोनच शिक्षक पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांना शिकवतात. संगणक प्रशिक्षकांसह शिक्षकांची मागणी करण्यात आलेली आहे. रिजवाना सय्यद, केंद्रप्रमुख