आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा तिढा जैसे थे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये एकीकडे रिक्त जागा आहेत तर दुसरीकडे अतिरिक्त शिक्षक समायोजनाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हा तिढा सुटलेला नाही. सध्या जिल्ह्यात ६९ अतिरिक्त शिक्षकांना समायोजनाची प्रतीक्षा आहे. तर ६८ रिक्त जागांवर शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. दरम्यान अतिरिक्त शिक्षकांना रिक्त जागांवर समायोजित करण्यास संस्था तयार नसल्याने हा तिढा जैसे थे आहे.
दरम्यान या विषयासाठी िशक्षक माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दरराेज दाखल होतात. मात्र, अधिकाऱ्यांची भेट घेण्यापेक्षा ते लिपिकाच्या टेबलाजवळ घुटमळतात. अनेक महिने उलटले तरी हा प्रश्न सुटलेला नाही.
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत बहुतांश शाळांमध्ये रिक्त जागांची संख्या वाढली आहे. विद्यमान परिस्थितीत जिल्ह्यात डीएड पदविकाधारक तब्बल ५० अतिरिक्त शिक्षक आहेत. तर डीएड पदविकेच्या अवघ्या आठ जागा रिक्त आहेत. तसेच प्रशिक्षित पदवीधर म्हणजेच बीएड पदवीधारक सध्या १९ अतिरिक्त आहेत. तर रिक्त जागांची संख्या ६० एवढी आहे. जोपर्यंत रिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होत नाही तोपर्यंत नवीन भरती राबवण्यास परवानगी नाही. परिणामी आहे तीच परिस्थिती कायम राहणार आहे. सन २०१२ पासून अतिरिक्त असलेल्या १२ शिक्षकांचे समायोजनही अद्याप होऊ शकलेले नाही.
ज्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करण्यात येणार नाही त्या शाळांची पदे गोठवण्यात येतील, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाहीदेखील करण्यात आली. मात्र, जागा गोठवल्यानंतर संस्थाचालकांनी न्यायालयात धाव घेतल्याने सध्या तरी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला ब्रेक लागला आहे. शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांची भेट घेणे अपेक्षित असते. मात्र, तसे करता शिक्षक कार्यालयात बेडसे नामक कर्मचाऱ्याच्या टेबलाजवळ घुटमळतात. दरम्यान शिक्षकांनी परस्पर कर्मचाऱ्याच्या या भेटीमागे अर्थकारणाचे गणित जुळतात. दरम्यान एकीकडे अतिरिक्त शिक्षकांना शासनाला वेतन अदा करावे लागत आहे. तर दुसरीकडे रिक्त जागांमुळे अध्यापनावर त्याचा परिणाम होत आहे. ३१ मे रोजी शिक्षक मोठ्या प्रमाणावर निवृत्त झाल्याने रिक्त जागांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
शिक्षक वाऱ्यावरच
जिल्ह्यात डीएड पदविकाधारक तब्बल ५० अतिरिक्त शिक्षक आहेत. तर डीएड पदविकेच्या अवघ्या आठ जागा रिक्त आहेत. तसेच प्रशिक्षित पदवीधर म्हणजेच बीएड पदवीधारक सध्या १९ अतिरिक्त आहेत. तर रिक्त जागांची संख्या ६० एवढी आहे. जोपर्यंत रिक्त जागांवर शिक्षकांचे समायोजन होत नाही तोवर नवीन भरती करण्याचा प्रशासनाने विचार केला आहे. त्यामुळे शिक्षक द्विधा मन:स्थितीत आहेत.
संस्थाचालक अडूनच
रिक्तझालेल्या जागांवर शिक्षकांना समायोजित करण्यात यावे, असे आदेश आहेत. बऱ्याचशा जागा या खासगी संस्थांमध्ये असून, तेथील संस्थाचालक मात्र शिक्षकांना सामावून घेत नाहीत. त्यांना याबाबत प्रशासनाने तंबी दिलेली असली तरी ते जुमानत नाहीत. त्यामुळे समायोजन झालेले शिक्षक समायोजन व्हावे म्हणून शिक्षणाधिकारी कार्यालयात चकरा मारतात. शासनालाही या शिक्षकांना शिकवताच वेतन द्यावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शासनाचा खर्च होत आहे. संस्थाचालकांनी हटवादी धोरण स्वीकारल्यामुळे एकूणच शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
दरम्यान संस्थाचालकांनी नरमाईची भूमिका घेत शिक्षकांना कामावर रुजू करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थाचालकांशी योग्य अशी चर्चा करून प्रशासनाने तोडगा काढण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.