आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लेखोरांची काढली धिंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- पोलिसांचा विसर आणि बेबंदशाहीत वावरणाऱ्या गावगुंडांनी अतुल गर्दे आकाश शिंदे यांच्यावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. अवघ्या विशीतील या टोळक्यावर लूट, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या या टोळीला बुधवारी दुपारी धुळे न्यायालयाने कोठडी सुनावली. यानंतर सायंकाळी त्यांची धिंड काढण्यात आली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अतुल राजेंद्र गर्दे (२२) याच्यावर साक्रीरोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेनंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास भोज यांच्या पथकाने रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. यानंतर रात्रीतून मोगलाई परिसरात पोलिसांनी कारवाई करून सहा तरुणांना गजाआड केले आहे. त्यांची नावे विशाल लक्ष्मण मराठे (२०), गौरव राजाराम कुलेवार (२२), आकाश राजाराम कुलेवार (२०), अरुण अभय राऊत (२८), विशाल राजू सूर्यवंशी (२०), उत्कर्ष कृष्णा पालेकर (२०) अशी आहेत. या सहा जणांसोबत इतर पाच ते सहा जणांनी हा हल्ला केला, अशी तक्रार आकाश कैलास शिंदे (२२) याने दिली आहे. या टोळीला सायंकाळी घटनास्थळी नेण्यात आले.
घटना कशी कुठे घटली? याबाबत त्यांना विचारणा केल्यावर या टोळीने जागा देखील दाखविली. हे करतांना पोलिसांनी त्यांना कमलाबाई हायस्कुलजवळील चौकाजवळून मिरवत नेले. धिंड काढलेल्या या तरुणांना जवळच असलेल्या व्यापारी संकुलात देखील नेण्यात आले. पोलिस निरीक्षक देवीदास भोज, उपनिरीक्षक बी.डी.पाटील यांच्या पथकाने या टोळीला सोबत नेले होते.दरम्यान, यानंतर पसार झालेल्या टोळक्याचा पोलिस शोध घेत आहे. त्यासाठी बुधवारी काही ठिकाणी चौकशी करण्यात आली. तर अटक करण्यात आलेल्या या टोळक्याला दुपारी धुळे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
काय घडले मंगळवारी?
कमलाबाई कन्याशाळेजवळील गरुड मैदानाच्या गेटजवळ विशाल मराठे हा एका मुलीचा हात आपल्या हाती घेऊन गप्पा मारत होता. आकाश शिंदे याने त्याला याबाबत जाब विचारला. यातून आकाशला मारहाण झाली. या वेळी त्याचा आतेभाऊ अतुल हा मदतीसाठी आला. त्यामुळे या टोळीने रिक्षातून इतर सहकाऱ्यांना बोलावले. त्यानंतर या टोळक्याने विशाल अतुल यांना मारहाण केली. तसेच अतुलच्या गळयातील साेन्याची चेन लुटून नेण्यात आली, अशी तक्रार दाखल झाली आहे.