आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकीदार केबल ऑपरेटरांचे कंट्रोल रूम सील; प्रक्षेपण खंडित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - केबल ऑपरेटरांकडे थकित असलेल्या करमणूक कराचा भरणा करण्यासाठी वारंवार सूचना करून तसेच नोटीस देऊनही केबल ऑपरेटर प्रतिसाद देत नसल्यामुळे शुक्रवारी अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांनी थेट अाॅनलॉग सिस्टिमवरच घाला घालत थकबाकीदार केबल अॉपरेटरांना जोरदार झटका दिला. शहरातील दोन्ही एमएसओंच्या सेंटरवर ही कारवाई करण्यात आली. पुढे सलग तीन दिवस सुटी असताना करण्यात आलेल्या या कारवाईमुळे थकित रकमेचा भरणा होऊ शकणार नाही. परिणामी शहरासह परिसरात मोठ्या क्षेत्रात केबल प्रक्षेपण बंद राहणार आहे.
केबल वापरकर्त्या ग्राहकांकडून करमणूक कराची वसुली करून नियमानुसार शासनाकडे तो कर भरण्याची जबाबदारी केबल ऑपरेटरांवर आहे. मात्र, बहुतांश आॅपरेटर वेळेवर करमणूक कराचा भरणा करीत नाही. अशा थकबाकीदार केबल ऑपरेटरांना जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत अनेकदा नोटिसा बजावलेल्या आहेत. तसेच बैठक घेऊन वेळोवेळी सूचनाही केलेली आहे. मात्र, त्यानंतरही केबल ऑपरेटर भरणा करीत नसल्यामुळे मल्टि सिस्टिम ऑपरेटर अर्थात एमएसओंना नोटीस बजावत थकबाकीदार केबल ऑपरेटरांचे पॅचकार्ड बंद करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्या अनुषंगाने एमएसओंनी कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, ही कारवाई झालेली नसल्यामुळे अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथे असलेल्या साई डिजिटल केबल व्हिजन तसेच हाथवे केबल या दोन एमएसओंच्या सेंटरवर धडक कारवाई केली. एमएसओंचे सेंटर सील करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार होती. मात्र या वेळी साई डिजिटलच्या संचालकांनी वास्तव परिस्थितीवर चर्चा करून थकबाकीदार असलेल्या ऑपरेटरांचे पॅचकार्ड बंद करण्याची विनंती केल्यानंतर थकबाकीदार ऑपरेटरांचे प्रक्षेपण बंद करण्याची कारवाई करण्यात आली. त्यात साई डिजिटल येथील १६ थकबाकीदार ऑपरेटरांचे पॅचकार्ड बंद करण्यात आले. तर हॅथवेच्या २५ ऑपरेटरांचे पॅचकार्ड बंद करण्यात आहे. बंद केलेले पॅचकार्ड अप्पर तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने सील करण्यात आले आहेत. जोपर्यंत ऑपरेटर थकित रकमेचा भरणा करणार नाहीत तोपर्यंत पॅचकार्ड सुरू करण्यात येणार नाही. पॅचकार्ड बंद करण्यात आल्यामुळे हजारो केबल वापरकर्त्या ग्राहकांचे प्रक्षेपण बंद होणार आहे. आगामी तीन दिवस शासकीय सुटी असल्यामुळे सुटीच्या कालावधीत शासकीय महसूलचा भरणा होणार नाही. त्यामुळे सलग तीन दिवस शहरासह परिसरातील बहुतांश भागात केबल प्रक्षेपण बंद राहणार आहे. केबल ऑपरेटरांच्या चुकीमुळे सामान्य केबल वापरकर्त्या ग्राहकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार करमणूक कराचा भरणा करणाऱ्या केबल ऑपरेटरांना हा मोठा फटका सहन करावा लागलेला आहे.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून महत्त्वाचे चॅनल्स केबलच्या माध्यमातून बंद आहेत. सेट टॉप बॉक्स बसवण्यासाठी ही प्रक्रिया केली. मात्र, त्यावरच आता गदा येणार असल्याचे दिसते.
केबल कंट्रोल रूम सील करताना तहसीलदार देवरे.

पॅचकार्ड केले सील...
^केबल ऑपरेटरांकडील थकबाकी वसुलीसाठी एमएसओंना प्रक्षेपणाची सूचना केलेली होती. मात्र, कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे शुक्रवारी धडक कारवाई करून पॅचकार्ड सील करण्यात आले. दरम्यान यानंतरही जर थकित रकमेचा भरणा करण्यात येत नसेल तर कठोर कारवाई करण्यात येईल. -ज्योती देवरे,अप्पर तहसीलदार

सोमवारपर्यंत मुदत
सोमवार(दि.१२) पर्यंत थकबाकीदार ऑपरेटरांनी थकित रकमेचा भरणा केला नाही तर ऑपरेटरांचे ऑनलॉग बंद करण्याचा इशारा दिला. आॅपरेटरांनी थकबाकीबरोबरच फोरटूबी लायसन्स अपडेट केलेले नाही.

शहरात ३५ लाखांची थकबाकी
शहरातील दोन एमएसओअंतर्गत असलेल्या केबल ऑपरेटरांकडे जवळपास ३५ लाखांची थकित रक्कम आहे. त्यापैकी साई केबल लाइनवरील १६ ऑपरेटरांकडे १५ लाख तर हाथवे लाइनवरील २५ ऑपरेटरांकडे २० लाख थकित आहेत.
बातम्या आणखी आहेत...