आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charge Sheet Filed Against Project Officers Along With Eight

प्रकल्प अधिकाऱ्यांसह अाठ जणांवर गुन्हे, साक्रीत जमिनीचा माेबदला अधिक दाखवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - साक्री येथे आदिवासी विद्यार्थी वसतिगृह जागेच्या खरेदीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी सहा अधिकाऱ्यांसह अाठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी केली हाेती. त्यात हा प्रकार उघडकीस आला. असुविधायुक्त जमिनीला सुविधायुक्त दर्शवून आणि शासकीय मूल्यापेक्षा ३६ लाख रुपये अधिक देऊन ही जमीन खरेदी करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी साक्री येथे वसतिगृह बांधण्यात येणार होते. त्यासाठी सन २००८ पासून जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू होती ; परंतु ही प्रक्रिया पार पाडताना अधिकाऱ्यांनी संगनमत केले. खरेदी करण्यात येणारी जमीन सुविधायुक्त असल्याचे भासवले. तसेच सन २००८मध्ये या जमिनीचे शासकीय बाजार मूल्य ८४ लाख रुपये असताना सन २०१०मध्ये नोंदणीकृत खरेदी खताद्वारे एक कोटी २० लाख रुपयात ही जमीन खरेदी केली. त्यातून शासनाचे सुमारे ३६ लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शिवाजी बुधवंत त्यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक विजय चौरे, जितेंद्रसिंग परदेशी, किरण साळी, संदीप पाटील, देवेंद्र वेंदे, संदीप कदम यांनी या प्रकरणाचा तपास केला. तक्रारीत तथ्य जाणवल्यानंतर आठही संशयितांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम १३ (१) (क) सह १३ (२) भादंवि कलम ४२०,१०९,१२० (ब), ३४ नुसार साक्री पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्यावर गुन्हे दाखल
नंदुरबारच्याएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शैला हेमंत वळवी, अविनाश अशोक चव्हाण, विकास निरीक्षक तुकाराम दला वाडीले, वसतिगृहाचे गृहपाल अशोक माणिक हातांगडे, साक्रीचे तत्कालीन दुय्यम निबंधक कैलास रामदास ठाकूर, मुद्रांक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक युवराज दगडू डामसे तसेच जमीन मालक नरेंद्र दत्तात्रय पोतदार, सुनील जनार्दन इखनकर.
चौकशीनंतर गुन्हा
अधिकाऱ्यांनीशासनाला कागदोपत्री गंडा घातल्याची तक्रार एका नागरिकाने केली. त्यामुळे त्यांनी कागदपत्रांसह धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून चौकशी करण्यात आल्याने हा उपक्रम उघडकीस आला. सुरक्षेच्या कारणास्तव तक्रारदाराचे नाव जाहीर केले नाही.