आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईनंतर गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शहरात महापालिका हद्दीत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे. तसे महापालिकेतर्फे आवाहनही करण्यात आले आहे. त्यानंतर मनपाच्या पथकातर्फे प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. सोमवारीही राजकमल टॉकीज परिसरात दुकानातून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्या वेळी येथील दुकानदारांनी या पॅकिंगच्या िपशव्या असल्याचे सांगितले. मात्र, पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना बंदीच असल्याचे आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असून, त्यापेक्षा जास्त जाडीच्या पिशव्या किंवा कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले आहे. तर सध्या अशा नियमबाह्य प्लास्टिक पिशव्या जप्त करणे सुरू केले आहे. तसेच व्यावसायिकांना नोटिसाही देण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे सहायक आयुक्त हेमलता डगळे कर्मचाऱ्यांनी सकाळी राजकमल टॉकीजच्या मागे सद‌्गुरू प्लास्टिक दुकानातून साधारणपणे १० क्विंटल प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. त्यानंतर येथील सर्व व्यापारी गोळा होऊन महापालिकेत आले. तेथे नगरसेविका कशीश उदासी यांचे पती गुलशन उदासी अमोल मासुळे यांची भेट घेऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ज्या प्लास्टिक पिशव्यांना बंदी नाही. त्याही मनमानी पद्धतीने जप्त करून नेल्याची तक्रार केली. यानंतर या दुकानदारांनी आयुक्तांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी केवळ कॅरीबॅग म्हणजे धरण्यासाठी जागा असलेल्या पिशव्यांना बंदी असल्याचे सांगितले.
तर किराणा माल पॅकिंगसाठी असलेल्या पिशव्या राज्यात सर्वत्र सुरू असल्याचे सांगत त्यांना बंदी नाही, अशी बाजू मांडली. तर मनपा कर्मचाऱ्यांनी सर्वच माल जप्त करून आणला आहे. त्या वेळी त्यांच्याकडे साधे ओळखपत्रही नव्हते.

पिशव्यांच्या वापराबाबत त्यांनी अध्यादेशही दाखवला. आयुक्त डाॅ. नामदेव भोसले यांनीही त्याचाच आधार घेऊन सांगितले की, ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी आठ बाय बारा इंच आकारापेक्षा लहान प्लास्टिक पिशव्यांना बंदी आहे. तरी याची सविस्तर माहिती वरिष्ठ स्तरावरून घेणार आहे. मात्र, या वेळी जप्त केलेल्या पिशवीवर दंड आकारणी करण्यात येणर आहे. तर यापुढेही ही बंदी कायम राहणार आहे. त्यात कुणी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्याय शोधावा तसेच दुकानदारांनीही पन्नास मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्याच पिशव्यांची िवक्री करावी, असे त्यांनी या वेळी सांगितले.
दरम्यान यापुढेही महापालिकेकडून प्लास्टिकवरील कारवाई सुरूच राहणार असून, ज्या ठिकाणी प्लास्टिक विक्री होत असेल त्या ठिकाणी महापालिकेच्या पथकाकडून धाडी टाकण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...