आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे मतदारसंघ : मराठा, मुस्लिम, मनिपॉवरच ठरवणार यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - मुद्दय़ांपेक्षा पडद्याआडच्या समाजनिहाय समीकरणांवर अवलंबून असलेल्या धुळ्याच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार अमरीश पटेल आणि भाजपच्या डॉ. सुभाष भामरे या दोघांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. एकगठ्ठा मतांअभावी दुसर्‍याच घटकांच्या हाती या दोघांची मदार आहे. म्हणूनच प्रत्येक पाऊल जपून टाकताना दोन्ही उमेदवारांनी केवळ गणिते जुळविण्यावर भर दिला आहे.
धुळे मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित मानला जातो. मात्र, या मतदारसंघाला अधूनमधून धक्के देण्याचे काम भाजपने केले आहे. सन 1991 व 2004 चा अपवाद वगळता या मतदारसंघात खासदारही रिपीट झालेला नाही. पाच वर्षांपूर्वी भाजपने खासदारकी मिळविली. त्यामुळे यंदाही यश मिळविण्याची या पक्षाला आशा आहे. तर गतवेळच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे सगळे गट-तट एकत्रित आले आहेत. त्यातच मध्यंतरी राहुल गांधी यांचा दौरा झाल्यामुळे काँग्रेसच्या गोटात चैतन्य आहे.
भाजपने यंदा शिवसेनेतून आलेल्या डॉ. सुभाष भामरेंना उमेदवारी दिल्यामुळे युतीत खळबळ उडाली. मात्र, त्यानंतर परिस्थिती सावरल्याचे दिसते. काँग्रेसचे अमरीश पटेल यांनी चारदा विधानसभा जिंकली आहे. मात्र, गतवेळी लोकसभा निवडणूकीत त्यांना यश मिळाले नव्हते. तर डॉ. भामरे यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. अमरिश पटेल यांची उद्योजक म्हणून ओळख आहे तर डॉ. भामरे हे अगदी नवीन चेहरा म्हणून पुढे आले आहेत. या दोन्ही उमेदवारांची राजकीय गणिते मात्र पूर्णत: ‘थ्री एम’वर अवलंबून आहेत. त्यातील मराठा व मुस्लिम या दोन फॅक्टरवर उमेदवार प्रकर्षाने भर देत आहेत. डॉ. भामरे यांना मराठा म्हणूनच भाजपने पुढे केले आहे. मालेगाव परिसराकडील इतर काही राजकीय दिग्गजांनी पाठिंबा जाहीर केला आहे. भाजप व शिवसेनेच्या समीकरणात मुस्लिमांना बहुतांशी स्थान नसते, हे पाहता मराठा कार्डावर भाजपने जोर दिला आहे. त्याचवेळी मालेगाव, धुळय़ातील अल्पसंख्याकांना अगदी काही प्रमाणात त्यांनी गृहीत धरले आहे.
कॉँग्रेसचे दोन्ही डगरींवर हात
मालेगाव, धुळे शहरातील अल्पसंख्याकांवर सर्वाधिक भर देताना कॉँग्रेसने मराठा कार्डही जवळ केले आहे. गटातटात विखुरलेल्या आजी-माजी पदाधिकारी सोबत फिरताना दिसत आहेत. मात्र, अंतर्गत बंडाळीचा धोकाही कायम आहे. गतवेळी अंतर्गत गटबाजीमुळेच कॉँग्रेसचा पराभव झाला होता. या वेळी स्थिती थोडी वेगळी असली तरी जातनिहाय समीकरणांवर भर देत काँग्रेस नेते व उमेदवारांची पावले पडत आहेत.
धुळे मतदारसंघात नाशिकचाही काही भाग येतो. त्यामुळे खासदाराला दोन्ही जिल्हय़ात कामाची संधी मिळते. मात्र, काँग्रेस किंवा भाजपने गेल्या पाच वर्षांत या दोन्ही जिल्हय़ाची राजकीय मशागत करण्याची तसदी घेतली नाही. परिणामी विकासकामांचे मुद्दे पुढे करता येत नाहीत. त्यामुळेच पडद्याआड घडणार्‍या घटनांवर लक्ष ठेवून दोघाही उमेदवारांना वाटचाल करावी लागत आहे.

पुढील स्लाइडमध्ये, लढाईतील अधिक-उणे