आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule Railway Station Can Become Movie Shooting Location

धुळे रेल्वेस्थानक हाेऊ शकते चित्रपट शूटिंगचे लाेकेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- चित्रपटांमध्ये धावती रेल्वे अथवा रेल्वेस्थानकांवर आधारित शूटिंग सध्या मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र, मुंबईपासून जवळ अगदी कमी रेल्वेफेऱ्या असलेले एकही रेल्वेस्थानक नाही. धुळे रेल्वेस्थानक त्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या स्थानकात दिवसभरात केवळ चार रेल्वेफेऱ्या होतात. मालवाहू रेल्वेची आठ दिवसांतून एकदा फेरी होते. त्यामुळे दररोज रिकामे राहणारे स्थानक शूटिंगसाठी फायदेशीर ठरू शकते. रेल्वे प्रशासनाने अद्याप त्याकडे लक्ष दिलेले नाही. मात्र, शूटिंगच्या दृष्टीने विचार झाला तर धुळे स्थानक चांगले लोकेशन होईल. त्याचबराेबर उत्पन्नाचे साधनही होईल.
धुळे रेल्वेस्थानकाला शंभर वर्षांचा कालावधी उलटला आहे. रेल्वेमार्गाद्वारे शहर मुंबईसारख्या महानगराशी जोडले गेले आहे. धुळे- चाळीसगाव पॅसेंजर ही रेल्वेसेवा अनेक वर्षांपासून आहे तशीच सुरू आहे. त्यानंतरची स्थानके जंक्शन झाली आहे. परिणामी या रेल्वेस्थानकांवर शूटिंगसारख्या बाबीसाठी प्रशस्त अशी जागा शिल्लक नाही. त्यामुळे धुळे स्थानकाचा चित्रपटांच्या शूटिंगसाठी वापर वाढू शकतो, असा सर्व्हे पुढे आला आहे.
चित्रपटातील बरीच दृश्ये रेल्वेवर चित्रित केली जातात. त्यात रेल्वेच्या छतावरील फाइट, गाण्याचा सीन बऱ्याच चित्रपटांत आहे. रेल्वेस्थानकावरील वर्दळ, धावती रेल्वे पकडण्याचे अनेक सीन विविध चित्रपटात विशेष ठरले आहे. त्यासाठी व्यग्र रेल्वेस्थानकावर चित्रपटांचे शूटिंग करणे तांत्रिकदृष्ट्या त्रासदायक ठरते, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या त्याचा खर्चही खूप येतो. त्याचप्रमाणे चित्रपटांच्या शूटिंगसाठी असलेला लवाजमा, सिनेतारकांचे कामावर एकाग्रता या सर्वांवरही बऱ्याचदा फरक पडतो. याउलट धुळे रेल्वेस्थानकासारख्या ठिकाणी रेल्वेगाड्यांची एवढी व्यग्रता नाही. तर शूटिंसाठी पुरेशी होईल एवढी प्रवासी संख्या आहे. त्याचप्रमाणे आता धुळे स्थानकातून चार वेळा रेल्वे जात असल्याने शूटिंगलाही पुरेसा वेळ उपलब्ध आहे. तसेच इतर रेल्वेस्थानकांपेक्षा खर्चातही बचत होऊ शकते, अशी स्थिती अनुकूल आहे.
मुंबई, नाशिकपासून जवळ
चित्रपटाच्या शूटिंगसाठी धुळे रेल्वेस्थानकाचा उपयोग चित्रपट निर्मात्यांना फायद्याचा ठरू शकतो. धुळे रेल्वेही मुंबईशी जोडलेली आहे. त्यामुळे एका रात्रीतून रेल्वेने येऊ शकतात. तसेच महामार्गाच्या माध्यमातून पाच ते सहा तासातही पोहोचता येते. तसेच नाशिक शहर रस्त्याच्या मार्गाने तीन तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे एका दिवसातही काम आटोपून मुंबई रवाना होऊ शकतात. त्यातून वेळ, पैसा दोन्ही वाचेल.
जाणाऱ्या रेल्वेची वेळ
धुळे रेल्वेस्थानकातून धुळे-चाळीसगाव पॅसेंजर सकाळी ७.५० वाजता, त्यानंतर ११.४० वाजता, दुपारी ३.३० वाजता सायंकाळी ७.२० वाजता सुटते. या व्यतिरिक्त मालवाहू रेल्वेही येते; परंतु ती नियमित येता महिन्यातून सात ते आठ वेळा माल उतरवण्यासाठी येतो. त्यामुळे मधल्या पूर्ण काळात स्थानक परिसर रिकामा असतो. त्याचाच उपयोग करता येऊ शकतो.