आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी "अस्तित्वा'चं झुकणं कुठंतरी थांबवा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- राजकीय सारीपाटावर आकुंचित झालेला राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, याची जाणीव सध्या हरवत आहे. नेते काँग्रेसच्या वळचणीला जातात. त्यामुळे वारंवार या पक्षाचे केंद्रस्थानही बदलते. आतापर्यंत शिरपूरचा आदेश शिरसावंद्य मानणाऱ्या या पक्षाला अचानक काँग्रेसच्याच जवाहर नामक दुसऱ्या गटाशी जुळवून घेण्याची गरज भासायला लागली आहे. त्यासाठी या पक्षाचे चेहरा ठरणारे नेते माजी मंत्र्यांपुढे झुकले तेव्हा या वेगळ्या राजकीय गणितात राष्ट्रवादीचे अस्तित्व पुन्हा दुसऱ्या दावणीला बांधले जातेय काय, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उभा ठाकला.
महापालिकेच्या सत्तेत दमदार ठाण मांडलेल्या राष्ट्रवादीच्या दारात इतर पक्षांनी यायला हवे. पण इथे मात्र उलटेच घडते आहे.

जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजवर्धन कदमबांडे हे एकमेव संचालक निवडून आले आहेत. १७ संचालकांपैकी ते एक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी म्हटली तर किमान निम्म्या जागा राष्ट्रवादीने लढवून त्या पदरात पाडून घ्यायला हव्या होत्या. मात्र, जागांचा आलेख पाहिला तर धुळे तालुक्यात चंचुप्रवेश करणाऱ्या विजय नवल पाटील यांचा मुलगा अनिकेतचा अपवाद सोडला तर सगळ्या जागांवर काँग्रेसने बाजी मारली. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न वेगाने पुढे आला आहे. बरे या सगळ्या विजयाचे श्रेय राजवर्धन कदमबांडे यांनी माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार सुरूपसिंग नाईक आमदार अमरिश पटेल या काँग्रेसच्या तिघा नेत्यांना देऊन टाकले. म्हणजे श्रेय घेण्यातही राष्ट्रवादी पक्ष म्हणून मागेच राहिला.
त्यानंतर माजी मंत्री रोहिदास पाटील यांची तातडीची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या निवासस्थानी जावे लागले. त्यानंतर त्यांचा वरदहस्त कायम राहावा, म्हणून झुकावेही लागले. याचा अर्थ राजकीय वर्तुळात फारच वेगळा घेतला गेला. राष्ट्रवादीची फळी भक्कम असताना, त्याचबराेबर पाच लाख लाेकसंख्येच्या शहरातील महापालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादीला असे केविलवाणे प्रदर्शन करायची गरज हाेती का, हा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावतो आहे.
राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न असा पुढे आलेला असताना भारतीय जनता पक्षाचा केविलवाणा पराभव या पक्षाच्या नेत्यांसाठी मानहानीकारक म्हणावा लागेल. पॅनल देऊनही या पक्षाला एकही संचालक निवडून आणता आला नाही. याची प्रचिती खासदारांचे बंधू सुरेश रामराव पाटील यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला तेव्हाच आली होती. भाजपकडे ग्रामीण भागातील विविध कार्यकारी संस्था नव्हत्या तर पॅनल उभे करायची गरज नव्हती. आमदार अनिल गोटे यांनी जिल्हा बँकेविरोधात मोठ्या प्रमाणात आरोप केले. पण त्या आरोपांचा फायदा भाजपला करून घेता आला नाही. खासदारांच्या खांद्यावर पॅनलची बंदूक ठेवून भाजपने निवडणूक लढवली. पण मनापासून कोणीच सहभागी झाले नाही.
दहा वर्षांनंतर सत्ता पालटवण्याची चांगली संधीही भाजपला साधता आली नाही. लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांना ग्रामीण जनतेने प्रतिसाद दिला. तेव्हापासूनच विविध कार्यकारी संस्थांवर लक्ष दिले असते तर दोन्ही जिल्ह्यात चित्र वेगळे दिसले असते. आमदार जयकुमार रावल यांना त्यांच्या शिंदखेडा तालुक्यातील जागाही टिकवता आल्या नाही. त्यामुळे भाजप जिल्हा बँकेत नापास झाले. ही भाजपची लाट ओसरल्याची नांदी तर नव्हे ना? असा प्रश्न पुढे यायला लागला आहे.
नात्या-गोत्याची खेळी..
धुळे तालुक्यात नवलनगर साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या विजय नवल पाटील यांनी बहुतांश राजकारण जळगाव जिल्ह्यात केले. पण मुलाला धुळे तालुक्यातूनच जिल्हा बँकेसाठी संधी मिळवून दिली. काँग्रेसच्या विजय पाटलांनी अनिकेतला भाजप पुरस्कृत म्हणून उभे केले होते. त्यांना भाजपच्या लाटेची आस होती. त्याच वेळी रोहिदास पाटील आपले ऐकणार नाही, हेही त्यांना माहीत होते. काँग्रेसने उभ्या केलेल्या प्रमोद पाटलांना पराभव पत्करावा लागला. याचे कारण किरण गुलाबराव पाटलांचे यशस्वी झालेले राजकारण होय. आतेभावाला निवडून आणण्याच्या खेळीमुळे काँग्रेसच्या उमेदवाराची हार झाली.