आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाच्या तडाख्यामुळे विजेचा वापर वाढला, पंखे, कुलर दिवसभर राहतात सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा लक्षणीय वाढलेला आहे. परिणामी दिवसा आणि रात्रीही थंडाव्यासाठी कुलर, एसीचा वापर वाढलेला आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्या असल्याने बच्चे कंपनीही घरीच राहत असल्याने विजेचा वापर वाढल्याने मागणीतही वाढ झाली आहे. सुदैवाने सध्या भारनियमन कमी असल्याने शहरवासीयांना काहीअंशी दिलासा मिळत आहे.
वैशाख वणवा वाढल्याने सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. दुपारी १२ नंतर उन्हाने कहरच केलेला असताे. वाढलेल्या तापमानामुळे नागरिक घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. एरवी धुळे शहरासाठी एक ते सव्वा लाख युनिट विजेचा वापर होत असतो. मात्र, उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे घराघरात पंखे, एसी, कुलर या सारख्या यंत्राचा वापर वाढल्याने विजेचा वापर झपाट्याने वाढलेला आहे. परिणामी विजेची मागणीही वाढली आहे. सध्या दिवसा पन्नास ते साठ हजार युनिट विजेचा वापर होत आहे. तर रात्रीही चाळीस ते पन्नास हजार युनिट विजेचा वापर होत असतो. एरवी २४ तासांत नव्वद हजार ते एक लाख युनिट विजेचा वापर होत असतो. सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हा वापर वाढलेला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात विजेच्या उत्पन्नात घट येत असल्याने उन्हाळ्यात भरदुपारी भारनियमन करण्यात येत असते.
दरवर्षापेक्षा या वर्षी मात्र काही प्रमाणात भारनियमन कमी करण्यात आलेले आहे. त्यातही बहुतांश फीडर हे आजही भारनियमनमुक्त आहेत. परिणामी भारनियमनाला कंटाळून होणारी आंदोलनेही काही प्रमाणात कमी झालेली आहेत.
दरम्यान असे असले तरी वीजचोरी गळती रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून कारवाई सुरूच आहे. जेणेकरून तूट भरून काढता यावी या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत आहे.
वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन
शहरातील बहुतांश भागात अद्यापही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. तसेच शहरातील झोपडपट्टी परिसरामध्ये आकडे टाकून वीजचोरीचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांना पायबंद घालून नागरिकांनी थकित रक्कम भरावी तसेच वीजचेारी टाळावी, असे आवाहन वीज कंपनीतर्फे करण्यात आले आहे. तसेच वीज गळती, चोरी, तूट यानुसार भारनियमन ठरवण्यात येणार आहे.
वीजनिर्मितीसाठी वीज
भारनियमनाची वेळ लक्षात घेता घरात कायम दिवे, पंखे सुरू राहण्यासाठी घरोघरी इन्व्हर्टर बसवण्यात येतात; परंतु हे इन्व्हर्टर कायम चार्ज करण्यासाठी विजेचा वापर होतो. त्यासाठीही वीज लागतेच. सर्वच शासकीय कार्यालये, संस्थांमध्ये याचा वापर होत असल्याने सातत्याने विजेचा प्रवाह सुरूच असतो. दरम्यान अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे आवश्यक आहे.
अपारंपरिक ऊर्जा गरजेची
धुळेशहरात तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. उन्हाच्या किरणांचा वापर सौरचूल, वीजनिर्मितीसाठी योग्य पद्धतीने केल्यास वीज वाचेल. सौरऊर्जेबरोबरच पवनऊर्जेचाही वापर करून घरात वीजनिर्मिती करता येणे शक्य आहे. त्यासाठी योग्य पद्धतीने जनजागृती अाणि शासनाचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेत सौरपॅनेल बसवण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. जेणे करून इतक्या मोठ्या प्रमाणात वाया जाणाऱ्या या नैसर्गिक ऊर्जास्रोताचा उपयोग होऊ शकेल.
बातम्या आणखी आहेत...