आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिळवणूक; आधारकार्डसाठी आर्थिक भुर्दंड!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- आधारकार्डत्यावरील क्रमांक महत्त्वाचा ठरायला लागला आहे. त्यासाठी आधारकार्ड काढणाऱ्यांची गर्दी व्हायला लागली आह. मात्र, हे कार्ड काढण्यासाठी केंद्रांमध्ये पन्नास रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत मागणी केली जाते. यामुळे नागरिकांची खुलेआम आर्थिक पिळवणूक होत आहे. मात्र, त्याकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होताना दिसते.
शासकीय योजनांसाठी ओळखीचा सक्षम पुरावा म्हणून आधार क्रमांकाला विशेष महत्त्व आले आहे. मोहिमेत बहुतांशी नागरिकांचे आधारकार्ड काढणे शक्य झालेले नाही, अशा नागरिकांसाठी आधारकार्ड काढण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्रात करण्यात आलेली आहे. या महा ई-सेवा केंद्रात कोणत्याच प्रकारचे शुल्क घेता नागरिकांची आधार नोंदणी होणे अपेक्षित आहे. मात्र, असे असले तरी शहरासह ग्रामीण भागातील महा ई-सेवा केंद्रांमध्ये आधार नोंदणीसाठी ५० रुपयांपासून तर १०० रुपयांपर्यंतची रक्कम वसूल करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे महा ई-सेवा केंद्रात मिळणाऱ्या सेवेसाठी प्रत्येक नागरिकाला पावती देणे अपेक्षित आहे. मात्र, घेतलेल्या रकमेची कोणतीच पावती ई-सेवा केंद्रात दिली जात नाही. या गोंधळामुळे नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याने या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे.
आधारकार्डची सुविधा शासनाने माेफत पुरविली आहे. तरही नागरिकांची पिळवणूक थांबत नाही. प्रशासनाकडे याकडे लक्ष द्यायला हवे.
अशी उकळतात रक्कम
शासनाने सर्व महा ई-सेवा केंद्रांना आधारकार्ड मोफत उपलब्ध करून देण्याची सूचना केलेली आहे. प्रत्येक आधारकार्डामागे ई-सेवा केंद्राला शासनाकडून अनुदान देय आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या अनुदानाची रक्कम महा ई-सेवा केंद्रांना अदा करण्यात आलेली नाही. परिणामी नाइलाजास्तव महा ई-सेवा केंद्रांकडून पन्नास रुपये वसूल केले जातात. दरम्यान पन्नास रुपयांपेक्षा जास्त पैसे घेण्यात येऊ नये, अशा अंतर्गत सूचना ई-सेवा चालकांनी स्वत:साठी ठरवून घेतलेल्या आहेत. प्रशासनाने केंद्र संचलित करायला देतांना कोणी नागरिकांकडून पैसे घेणार नाही, याची काळजी घ्यायला हवी होती. पैसे आकारणाऱ्या केंद्रांवर बंदची कारवाई करायला हवी. त्यासाठी अशा केंद्रांचा शोध घ्यायला हवा.
५०० रुपये दंडाची तरतूद
महाई-सेवा केंद्रात आधारकार्ड नोंदणी करीत असताना चूक झाली तसेच नोंदणी केल्यानंतर डाटा जनरेट झाला नाही तर महा ई-सेवा चालकाला पाचशे रुपये दंड भरावा लागताे. अशा पद्धतीने लागणाऱ्या दंडाची रक्कम महा ई-सेवा केंद्रचालक आधारकार्ड घेणाऱ्यांकडून पन्नास रुपयांच्या माध्यमातून घेत असतात.
...तर शंभर रुपये का?
शहरासह ग्रामीण भागात सर्वच ई-सेवा केंद्रांमध्ये आधारकार्ड नोंदणीसाठी पन्नास रुपये घेतले जातात. नागरिकांचा पन्नास रुपये देण्यास नकार नाही. मात्र ज्या ई-सेवा केंद्रांमध्ये शंभर रुपये वसूल करण्यात येतात. अशा केंद्रचालकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
फसवणुकीची तक्रार करायला हवी
- आधारकार्ड नोंदणीसाठी पैसे घेण्यात येऊ नये, यासंदर्भात आदेश आहेत. जर कोणत्या ई-सेवा केंद्रात नागरिकांची फसवणूक होत असेल तर त्यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करावी, सोडवणूक केली जाईल.
महेंद्र शिरसाठ, जिल्हा समन्वयक, महा ई-सेवा