आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Bike Burn Public Morcha On Police Station

नाशकात जाळपोळीचे सत्र, संतप्त नागरिकांचा अंबड पोलिस ठाण्यावर मोर्चा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील विविध भागांत रात्रीच्या वेळी वाहने जाळण्याची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यापूर्वी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील अपार्टमेंटमधील दुचाकी व चारचाकी वाहने जाळण्याचे धाडसही समाजकंटकांनी केले होते. सोमवारी पहाटे सिडकोतील पंडितनगर भागात अज्ञात गुंडांनी तीन ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यापूर्वीच्या घटनांमधील मुख्य आरोपींना पकडण्यात अजूनही पोलिसांना यश आलेले नाही.
सिडकोच्या इंदिरानगर परिसरात सोमवारी पहाटे पेट्रोल किंवा रॉकेलचे बोळे टाकून तीन ट्रक पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, धूर व आगीच्या ज्वाला दिसल्याने काही जागरूक नागरिकांनी तातडीने पाणी टाकून या वाहनांची आग विझवली. त्यामुळे
मोठे नुकसान झाले नाही. ही तीनही वाहने बांधकाम व्यावसायिकांची असून त्यात असलेल्या बांधकामाचे साहित्य व ताडपत्रीचे मात्र आगीत नुकसान झाले. एमएच 15-एजी 2513, एमएच 15-एजी 816 हे दोन आयशर ट्रक सोपान सानप व राजेंद्र घुगे यांच्या मालकीचे असून एमएच 15-जी 4133 हे 407 वाहन राजेंद्र अलगट यांच्या मालकीचे आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहने पेटवण्याची मालिकाच काही समाजकंटकांनी सुरू केली आहे. यापूर्वी तर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेली वाहनेही जाळण्यात आली होती. मात्र, दिवस उजाडल्यानंतरच या घटनेची माहिती पोलिसांना होते. त्यामुळे नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आज झालेल्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी या समाजकंटकांना तातडीने पकडावे, अशी मागणी करत अंबड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. मात्र, पोलिसांनी त्यांची समजूत काढली.
नागरिकांनो, संयम ठेवा
या जळीत कांडाचा तातडीने तपास सुरू केला आहे. या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी संयम ठेवावा तसेच पोलिसांवर विश्वास ठेवून तपासकामात सहकार्य करावे. या समाजकंटकांविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा असे कृत्य कुठेही आढळून आल्यास तातडीने आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण बोरकर यांनी केले.