आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेडरगाव तलाव परिसरात इको व्हिलेज साकारण्याची संकल्पना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे  - शहरापासूनसात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या डेडरगाव तलाव परिसरात बीओटी तत्त्वावर पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी इको व्हिलेज उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. त्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. 
 
शहरात एकही चांगले पर्यटन स्थळ नाही. तसेच शहरातील विविध भागात महापालिकेचे दोन ते तीन मोठे उद्यान आहेत. त्यातील टॉवर उद्यान इंग्रजकालीन असून, या उद्यानाचा काही वर्षांपूर्वी विकास करण्यात आला होता. या ठिकाणी कारंजे, मिनी ट्रेन बसवण्यात आली होती; परंतु उद्यानाची अल्पावधीत पुन्हा दुरवस्था झाली. सद्य:स्थितीत पांझरा नदी किनारी असलेल्या छत्रपती राजे संभाजी महाराज उद्यानाची अवस्था काही प्रमाणात चांगली आहे. हे उद्यान ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्यात आले आहे. इतर सर्व उद्यानांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शहरात चांगले पर्यटनस्थळ करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. काही वर्षांपूर्वी डेडरगाव येथे पर्यटनस्थळ विकसित करण्यात आले होते. या कामावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते; परंतु देखभाल, दुरुस्तीअभावी या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या उद्यानासह खेळण्यांची दुरवस्था झाली. त्यामुळे शहरातील नागरिकांना सुटीच्या दिवशी शिरपूर, शिर्डी सारख्या ठिकाणी जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता पुन्हा डेडरगाव तलाव परिसरात पर्यटनस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा तलाव परिसरातील जमीन महापालिकेच्या मालकीची आहे. या ठिकाणी आता बीओटी तत्त्वावर पर्यटन स्थळाची निर्मिती केली जाणार आहे. या विषयाला महापालिकेच्या महासभेतही मंजुरी देण्यात आली आहे. डेडरगाव तलावाचा परिसर शहरातून दूर शांत ठिकाणी असून, हा भाग ग्रामीण भागात येतो. तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती असून, या परिसराला निसर्गाचे वरदान लाभले. त्यामुळे या ठिकाणी इको व्हिलेजची प्रतिकृती उभारण्याची संकल्पना प्रशासनाची आहे. या ठिकाणी मॉडेल गाव तयार करण्याची संकल्पना प्रशासनाची आहे. 
महापालिका प्रशासनातर्फे याच डेडरगाव तलावाचा विकास करण्यात येणार आहे. 

यापूर्वीही प्रयत्न 
डेडरगावतलाव परिसराचा यापूर्वी खान्देश पॅकेजमधून विकास करण्यात आला होता. या ठिकाणी बोटिंगची सुविधाही करण्यात आली होती; परंतु देखभाल दुरुस्तीअभावी काही महिन्यातच या पर्यटनस्थळाची दुरवस्था झाली. त्यामुळे सुशोभिकरणाच्या कामावर करण्यात आलेला खर्च पाण्यात गेला आहे. तसे पुन्हा होऊ नये याची काळजी आता घेतली जावी. 

ऐतिहासिक पार्श्वभूमी 
सर विश्वेश्वरय्या यांनी डेडरगाव तलावापासून शहरापर्यंत गुरुत्वाकर्षणाने पाणी आणले आहे. या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून नैसर्गिक पद्धतीने पाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प साकारण्यात आला हाेता. सद्य:स्थितीत हा प्रकल्प बंद आहे. या परिसरात पर्यटनस्थळ झाल्यावर या प्रकल्पाचीही माहिती देता येईल. 

बोटिंग पुन्हा होणार 
डेडरगाव तलावापासून लळिंग किल्ला काही अंतरावर आहे. या तलावात लळिंग कुरण परिसरातून वाहणाऱ्या धबधब्याचे पाणी येते. तलावाच्या आजूबाजूला डोंगराचा परिसर आहे. आगामी काळात या तलावात पुन्हा बोटिंगची सुविधा सुरू करण्याचाही विचार महापालिकेने सुरू केला आहे. तसे झाल्यास पर्यटकांची चांगली सोय होणार आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...