आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मींनीच घेतला लक्ष्मीच्या स्वागतासाठी पुढाकार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- दुसरे अपत्यही मुलगीच झाल्याने निराश झालेल्या मातेस मुलीच्या जन्माचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावातील महिला आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. मुलीच्या जन्माचे महत्त्व पटल्याने संबंधित माताही तिच्या सासरकडील नातेवाइकांसह आनंदाने सासरी रवाना झाली. बहुसंख्य लक्ष्मींनी एकत्र येऊन लक्ष्मीचे स्वागत लक्ष्मी देऊनच केले. या सुखद अनुभवाची प्रचिती तालुक्यातील शिरूड येथील आरोग्य केंद्रात आली.
आरोग्य केंद्रात जळगाव जिल्ह्यात सासर असलेली महिला दुसऱ्या प्रसूतीसाठी दाखल झाली. पहिली मुलगी असताना तिला दुसरीही मुलगीच झाली. त्यामुळे ती निराश झाली. सासरचे दूषण देतील, अशी शंका तिच्या मनात आली. मात्र, आरोग्य केंद्रातील ओपीडी एएनएम देवका किसन धुर्मेकर यांनी संबंधित महिलेची समजूत घातली. इतकेच नव्हे आरोग्य केंद्राच्या परिसरातील महिलांना त्यांनी एकत्र केले. या घटनेला स्त्री जन्माच्या स्वागत कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले.
याप्रसंगी शिरूडचे सरपंच सुधीर पाटील, सदस्य चंद्रकला दौलत गायकवाड, प्राथमिक शिक्षिका सुवर्णा समाधान कोडे, रेहानाबी छोटू पटेल, नीता कोडे, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय गौंड, डॉ. कुलदीप गजरे, प्रा. जी. व्ही. पाटील, चितेश कुलकर्णी, केंद्राचे आरोग्य कर्मचारी महिला उपस्थित होत्या. देवका धुर्मेकर, चितेश कुलकर्णी यांनी स्त्री जन्माचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. तसेच महिलांनी आपल्या कार्याचा विविध क्षेत्रात कसा ठसा उमटवला हे सांगितले. तसेच अर्भकाच्या हातात पैसे, पुष्प देऊन त्याचे स्वागत केले.

लक्ष्मीनेच लक्ष्मीचे स्वागत केल्याची अनुभूती या वेळी उपस्थितांनी घेतली. याबद्दल देवका धुर्मेकर यांचा चंद्रभागा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून त्या केंद्रात प्रामाणिकपणे सेवा देत असल्याने गावात समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे केंद्रात महिला प्रसूती होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
प्रबोधन आवश्यकच
आज ग्रामीण भागासह शहरी भागातही मुलीनंतर मुलाचाच जन्म हवा ही भूमिका घेणारे अनेक आहेत. मुलगा मुलगी एकसमान अशा शासकीय प्रबोधनपर घोषणा दिल्या जातात; परंतु तरीदेखील लोकांची मानसिकता बदलताना दिसत नाही. आज समाजात दोन, तीन अपत्य मुलीच असल्या तरी आनंदी असणारी जोडपी आहेत. असे असताना मुलासाठी अट्टाहास करणाऱ्या पालकांची मानसिकता बदलून त्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. तेव्हाच मुलींचा जन्मदर वाढेल.
बातम्या आणखी आहेत...