आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाेंदणी हाेऊनही चार हजारांवर वाहनांचे रखडले अारसी बुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - येथील अारटीअाे कार्यालयात वाहन खरेदीनंतर महत्त्वाचे मानले जाणारे नोंदणी पुस्तक अर्थात आरसी बुक संपले आहेत. त्यामुळे वाहन खरेदीनंतरही अद्याप बहुतांशी वाहनचालकांना आरसी बुक मिळालेले नाही. त्यामुळे दीड महिन्यात चार हजार वाहने नोंदणी पुस्तकाअभावी रखडली अाहेत. तर दुसरीकडे आरटीओ कार्यालयाने आरसी बुक संपल्याचे मान्य केले. तरी पेंडिंग अर्थात रखडलेल्या वाहनांची संख्या ७०० ते ८०० पर्यंत असल्याचे नमूद केले आहे.
आरटीओ कार्यालयाकडून वाहन नोंदणी केल्यानंतर घरपोच आरसी बुक पाठवण्याचा दंडक आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून घरपोच आरसी बुक पाठवले जाते; परंतु यापैकी बहुतांशी आरसी बुक वाहनमालकांना मिळत नाही, असा आरोप नेहमी होताे. आता आरटीओ कार्यालय आरसी बुकच्या वेगळ्याच समस्येला सामोरे जात आहे. शासनाकडून पुरवठा होणारे आरसी बुक चक्क संपल्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनमालक अजूनही आरसी बुकपासून वंचित आहेत. आरसी बुक संपणे ही बाब सामान्य असली तरी ते संपण्यापूर्वीच आरटीओ कार्यालयाने पुरेशी काळजी का घेतली नाही, याबाबत वरिष्ठांना पूर्वकल्पना का देण्यात आली नाही, शिवाय वरिष्ठांनीही पाठपुरावा करून आरसी बुकची मागणी का केली नाही, यासारखे प्रश्न निर्माण होतात. या बाबी अर्थातच अारसी बुकबाबत जबाबदारी निश्चित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाकडे अंगुलीनिर्देश करतात.

दीड महिन्यापासून हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत चार हजार वाहने आरसी बुकपासून वंचित आहेत, असा आराेप होत आहे; परंतु आरटीओ कार्यालयाने मात्र निर्माण झालेल्या समस्येला दुजोरा दिला असला तरी हा प्रश्न दीड महिन्यापूर्वी नव्हे तर अवघ्या आठ दिवसांपासून भेडसावत असल्याचे सांगितले. शिवाय आरसी बुकअभावी पेंडिंग असणाऱ्या वाहनांची संख्या हजारामध्ये नसून ७०० ते ८०० पर्यंत असल्याचेही नमूद केले आहे. आरसी बुक संपल्याचा कार्यकाळ आणि पेंडिंग असलेली त्यांची संख्या यांच्या आकडेवारीत आरोप करणारे प्रशासन यांच्यात तफावत असली तरी निर्माण झालेली परिस्थिती तेवढीच गंभीर आहे.

वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा
^आरसी बुक संपल्याचे खरे आहे; परंतु दीड महिन्यापूर्वी नव्हे तर गेल्या आठवडाभरापासून त्यांची चणचण भासत आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरील कार्यालयातही पूर्वकल्पना दिली आहे. तसेच मागणीप्रमाणे अारसी बुक छपाईसाठी पाठवण्यात आले आहेत. लवकरच ते प्राप्त होतील. -व्ही.व्ही. लांडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

उपकरावर डोळा; सोयींकडे दुर्लक्ष
दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने रस्ता सुरक्षा निधीच्या नावाखाली वाहन खरेदीच्या करावर उपकर लावला. दुचाकी ते अवजड वाहनांवर यातून ते १० टक्के प्रमाणे हा उपकर लावण्यात आला. असे असले तरी दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी झाली; परंतु दिवाळीत खरेदी केलेल्या वाहनांच्या मालकांनाही अद्याप आरसी बुक मिळालेले नाही.

अशी आहे आकडेवारी...
सरासरी ७० ते ८० वाहनांसाठी दररोज आरसी बुकची रजिस्टरवर नोंदणी केली जाते. तर पोस्ट आॅफिसतर्फे आठवड्यातून किमान एकदा संबंधित कर्मचारी वाहन मालकांच्या नावे पत्त्यावर असलेले आरसी बुक घेण्यासाठी येतो. दर आठवड्याला सुमारे दीड ते दाेन हजार आरसी बुक पोस्ट कार्यालयात जातात; परंतु आरसी बुक संपल्यामुळे या दाेन्ही प्रक्रिया रखडल्याचे दिसते.
बातम्या आणखी आहेत...