शहादा : देह विक्री करणाऱ्या ६२ मुली तसेच चार महिलांना पोलिसांनी मंगळवारी कारवाई करून ताब्यात घेतले. तसेच या ठिकाणी आलेल्या वीस जणांना अटक करण्यात आली. त्यात प्रतिष्ठितांच्या मुलांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या महिला या बांगलादेशातील आहेत. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच त्यांची जयनगरच्या सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
शहरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असून, त्यात परप्रांतीय महिलांचा समावेश होता, अशी तक्रार पुणे येथील स्वयंसेवी संस्था रेस्क्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा शाहिनी व्ही. पडियारा यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी दुपारी दीड वाजता या ठिकाणी धाड टाकली.
या वेळी पोलिस उपअधीक्षक लतीफ तडवी, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, रेस्क्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा शाहिनी पडियारा, सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस उपनिरीक्षक अंकुश बोराटे, पोलिस निरीक्षक नीलिमा सातव, पोलिस उपनिरीक्षक बडगुजर, पोलिस उपनिरीक्षक अमृत पाटील आदी उपस्थित होते. या वेळी देहविक्री करणाऱ्या ६२ वारांगनांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांची कारवाई सुरू असतानाच बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कारवाईवेळी या परिसरात पोलिसांनी घेराव घातला होता. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या नागरिकांना पळण्याची संधी मिळाली नाही.
बनावट आधारकार्ड
नंदुरबार,शिरपूर, दोंडाईचा या शहरांमध्ये देहविक्रीचा व्यवसाय कमी झाला आहे. दुसरीकडे शहादा शहरात तो वाढला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराला लागून लघुसिंचन विभागाच्या पाटाजवळ या महिलांनी बस्तान बसवले आहे.
पुणे येथील रेस्क्यू फाउंडेशनच्या अधीक्षिका शाहिनी पडियारा चौकशी अधिकारी कुमार गुरू हे गेल्या सहा दिवसांपासून शहरात मुक्कामाला होते. पोलिसांनी पकडलेल्या ६६ महिलांमध्ये काही बांगलादेशातल्या महिलांचा समावेश आहे. काही राजस्थान, पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता शहरातील आहेत. अनेक महिलांकडे बनावट आधार कार्ड असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईच्या मुली
पोलिसांनी ६२ महिलांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम १५ अन्वये तर चार महिलांवर पिटा कायद्यान्वये कारवाई केली. कारवाईत एक अल्पवयीन आढळून आली. मुंबई येथील एका डान्सबार चालवणाऱ्या महिलेने तिला या वसाहतीत आणून सोडले होते. एकूण पाच मुली मुंबईच्या महिलेने आणल्याची माहिती पडियारा यांनी दिली.
३६ हजार रुपये जप्त
पोलिसांनी कारवाईनंतर पंचनामा केला. कारवाईत ३६ हजार ७५० रुपये इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान पिटाअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या चार महिलांना उद्या बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई, पुण्यातील दलाल
- शहाद्यात विदेशातील महिला देहविक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायात मुंबई, पुण्यातील काही दलालांचा सहभाग असल्याची माहिती प्राप्त झाली होती. जबरदस्तीने महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असेल तर त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम संस्था करते. संस्थेने आतापर्यंत देशभरात पाचशेपेक्षा जास्त कारवाया करून अल्पवयीन मुलींना या व्यवसायातून बाहेर काढले आहे. शाहिनीव्ही. पडियारा, अध्यक्षा, रेस्क्यू फाउंडेशन, मुंबई