आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ST Labour Organization Leader Took Away Empty Bus

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चक्क रिकामी बस नेत संघटना नेत्याचा बडेजाव, ताेट्यात असलेल्या एसटीला हंगामात फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- गर्दीच्या हंगामात मिळेल तेथून प्रवासी घेऊन एसटीच्या उत्पन्नात भर घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना दुसरीकडे एसटी कामगार संघटनेच्या एका नेत्याने धुळ्याकडून शहाद्याकडे चक्क खाली बस नेली. विशेष म्हणजे या बसमधून एकही प्रवासी नेण्यात आला नाही. त्यामुळे एसटीचे एका फेरीचे उत्पन्न बुडाले आहे. या प्रकारामुळे कामगार संघटनेच्या नेत्यानेही माहेरी बस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांचा कित्ता गिरवत महामंडळाच्या उत्पन्नावर टाच मारली आहे.
तोट्यात असलेल्या एसटीला उभारी आणण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. त्यात प्रवासी वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असतात. मात्र, काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आपमतलबी धोरणामुळे एसटी तोट्यातून बाहेर निघेल की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. येथील आगारात तत्कालीन आगारप्रमुखांनी माहेरासाठी बस सुरू करीत एक वेगळा पायंडा पाडला हाेता. पुढे ही बस बंद करण्यात आली. मात्र, अधिकाऱ्यांचाच कित्ता गिरवत २३ मे रोजी एका कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने धुळ्याकडून शहाद्याकडे रिकामी बस नेत आपणही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. शहादा आगारातील बस (क्र.एम.एच.१४,बी.टी २७१३) ही अवधान औद्याेगिक वसाहतीत असलेल्या कार्यशाळेत दुरुस्तीसाठी दाखल झाली होती.

दुरुस्तीनंतर ही बस २२ मे रोजी मध्यवर्ती बसस्थानकात दाखल झाली. या बसस्थानकातून शहादा आगारात कार्यरत असलेल्या तसेच कामगार संघटनेच्या नेता असलेल्या चालकाने २३ मे रोजी सायंकाळी ७:३० वाजेला ही बस धुळे आगारातून शहाद्याकडे काढली. शहाद्याकडे बस नेताना या बसमध्ये आगारातून बुकिंग करून प्रवासी बसवून बस नेणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित नेत्याने तसे केले नाही. शहाद्याकडे निघालेली ही बस गोराणे फाट्याजवळ असलेल्या पोलिस चौकीजवळ थांबवण्यात आली. या चौकीजवळ बसमध्ये असलेल्या सहचालकास उतरवण्यात आले. त्यानंतर खाली बस तशीच शिरपूर आगारात तेथून पुढे शहादा आगारात दाखल झाली.
दरम्यान चालकाने शहादा आगारात दाखल झाल्याचा वेळही ७:३०च दाखवला आहे. तसेच धुळे आगारातून निघण्याची वेळ दुपारी ३:३० वाजेची दाखवण्यात आली आहे. मात्र, धुळे आगारातून ही बस ज्या अर्थी सायंकाळी ७:३० वाजेला रवाना झालेली आहे. त्या अर्थी ही बस शहादा आगारात ७:३० वाजेला पोहाेचलीच कशी, असा प्रश्न आहे. तसेच गर्दीचा हंगाम असताना चालकाने धुळे आगारातून आगाऊ बुकिंग करून शिरपूर अथवा शहाद्यासाठी प्रवासी घेणे अपेक्षित असताना प्रवाशांना घेता कोणाच्या परवानगीने तोटा सहन करीत खाली बस नेली याची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे. कामगार संघटनेचा नेता असलेल्या या चालकाच्या मुजोरीमुळे एका बसच्या फेरीमागे मिळणाऱ्या उत्पन्नाचा तोटा महामंडळाला सहन करावा लागला आहे. या प्रकरणाची विभाग नियंत्रकांनी सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मुजोरी थांबवण्याची गरज...तर मिळू शकले असते उत्पन्न...