आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे महापालिकेवर महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने समिती स्थापन केली आहे. मात्र, त्यानंतरही अनेक भागांत पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. या स्थितीस महापालिकेवर सोमवारी आलेल्या हंडा मोर्चामुळे बळकटी मिळाली. देवपुरातील नगावबारी परिसरातील प्रियदर्शिनीनगरात गेल्या 15 दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढला होता.
शहराला पाणीपुरवठा करणा-या नकाणे, डेडरगाव तलावासह तापी नदीत चांगला पाणीसाठा असताना विस्कळीत नियोजनामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेतर्फे काही भागात एक दिवसाआड तर काही भागात दोन,तीन दिवसाआड, काही भागात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक व अधिका-यांची एकत्रित समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित असताना अधिकारी व समिती सदस्यांमध्ये समन्वय नसल्याने प्रश्न अधिक जटिल झाला आहे.
महिला महापालिकेत - शहरातील नगावबारी परिसरात प्रियदर्शिनीनगरात गेल्या 15 दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी नगरसेवक गंगाधर माळी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे वैतागलेल्या महिला व नागरिकांनी सोमवारी थेट महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. या वेळी लोकसंग्राम पक्षाचे अमोल सूर्यवंशी, दीपक जाधव, सुरेखा पाटील, राहुल कांबळे, रमेश कोळी, सागर वर्मा, सुकलाल मिस्तरी, अमोल कांबळे, तुषार भगत, योगेश मराठे, विनोद पवार, विनोद मोरे, नरू पाटील आदींसह महिला व नागरिक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी आयुक्त हनुमंत भोंगळे यांच्या दालनाकडे धाव घेतली; परंतु श्री. भोंगळे उपस्थित नसल्याने त्यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली.
...अन्यथा आंदोलन - या भागातील एका सार्वजनिक शौचालयातील घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. हा प्रश्न येत्या आठ दिवसांत सोडविण्यात येईल, असे आश्वासन या वेळी श्री. मुतकेकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
अधिका-यांच्या टेबलावर हंडे - उपायुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्या दालनात आंदोलनकर्ते धडकले. श्री. मुतकेकर यांच्या टेबलावर महिलांनी हंडे ठेवत त्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांना विस्कळीत पाणीपुरवठ्याची माहिती देण्यात आली. गेल्या 15 दिवसांपासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने महिला व नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, असा मुद्दा महिलांनी मांडला. या प्रश्नाकडे नगरसेवक व महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात आला. वसाहतीत केवळ दहा ते पंधरा मिनिटे पाणी येते. ते निदान 45 मिनिटे पाणी सोडावे, असे महिलांनी अधिका-यांना ठणकावून सांगितले.