आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा कोटी पाणीपट्टी थकित; महापालिका वसुली मोहीम तीव्र करण्याच्या तयारीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील मालमत्ताधारकांकडे असलेल्या थकबाकीच्या वसुलीसाठी पालिका प्रशासनातर्फे वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. पाणीपट्टीपोटी नळधारकांनी सुमारे दहा कोटी रुपये थकवले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील नागरिकांना नागरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. त्यानुसार प्रशासनातर्फे नागरिकांना या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न होत आहे. सुविधा पुरवण्यासह विकासकामे करण्यासाठी महापालिकेला लागणारा निधी विविध करांच्या माध्यमातून नागरिकांकडून वसूल केला जातो. त्यामुळे वसुली वेळेवर होणे आवश्यक आहे. ती वेळेवर झाली नाही, तर त्याचा परिणाम विकास कामांसह मूलभूत सुविधा पुरवण्यावर होतो. हीच स्थिती गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेची झाली आहे. शहरात सुमारे 70 हजार मालमत्ताधारक असून, त्यापैकी काहींनी मनपाचे सुमारे 40 कोटी रुपये थकवले आहेत. त्यात घरपट्टी आणि पाणीपट्टीचा समावेश असून, पाणीपट्टीपोटीची 10 कोटींची थकबाकी आहे.

महापालिकेतर्फे थकबाकी वसुलीसाठी वेळोवेळी मोहीम हाती घेण्यात आली आहे; परंतु वसुली विभागातील अपूर्ण कर्मचार्‍यांमुळे वसुलीवर र्मयादा येत आहेत. पाणीपट्टी वसुलीप्रमाणेच अवैध नळजोडणीची समस्याही गंभीर असून, अवैध नळजोडणी शोधण्यासाठी काही महिन्यांपूर्वी पथक नेमण्यात आले होते; मात्र तरीही हा प्रश्न सुटलेला नाही. पाणीपुरवठय़ाच्या वीजबिलापोटी महापालिकेला महिन्याला 74 लाख रुपये भरावे लागतात. त्या तुलनेत पाणीपट्टीची वसुली कमी आहे. त्यामुळे वसुलीसाठी विशेष प्रय} होणे अपेक्षित आहे.

नवीन वसाहतींचे मोजमाप अद्यापही झालेले नाही
शहराच्या चौफेर अनेक नवीन वसाहती निर्माण होत आहेत; मात्र अद्यापही सुमारे 12 हजार मालमत्तांची मनपाच्या वसुली विभागात नोंद नाही. त्यामुळे त्यांना मालमत्ता करवसुलीची बिले वाटप होत नसल्याची स्थिती आहे. नवीन मालमत्ताधारकांना करवसुलीची बिले दिल्यास महापालिकेच्या तिजोरीत मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न जमा होणार आहे.बिले देताना ती घरपोच मिळायला हवी, याची काळजी महापालिकेला घ्यावी लागणार आहे. त्यासाठी थेट कर्मचारी पाठवावे लागतील.

दोन कोटी रुपयांची वसुली
मालमत्ताधारकांकडून वसुली विभागातर्फे विविध 13 ते 14 प्रकारचे कर वसूल करण्यात येतात. त्यात प्रामुख्याने मालमत्ता आणि पाणीपट्टी कराचा समावेश आहे. त्यानुसार 23 डिसेंबरपर्यंत 2 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

शिरपूरच्या धर्तीवर पाणी योजना
एकीकडे पाणीपट्टीच्या थकबाकीमुळे महापालिका संकटात सापडलेली आहे. त्यामुळे शिरपूरच्या धर्तीवर पाणी योजना राबवण्याची भूमिका मांडली जात आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या निधीतून ही पाणी योजना होईल. त्यासाठी अभ्यासू व्यक्तींचे पथक तयार केले जाणार आहे.

शहरात पाणीपुरवठय़ाचे भक्कम स्रोत आहेत; मात्र नियोजनाअभावी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. शिरपूर शहरात मात्र दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होतो. तीनदा शुद्धीकरण केलेले पाणी लोकांना पुरवले जाते. असाच पर्याय शहरासाठी खुला ठेवण्यात येणार आहे. तापीची योजना त्यासाठी महत्त्वाची ठरेल. या योजनेसाठी मोठय़ा प्रमाणात वीजबिल येते; परंतु हीच योजना भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून शहरातील इतरही जलशुद्धीकरण केंद्रे आणि पाणी योजना जोडल्या जातील. जलशुद्धीकरणाचे प्रमाण वाढवताना त्यासाठी अभ्यासू व्यक्ती महापालिकेतर्फे नियुक्त केल्या जाणार आहेत. शिरपूर शहरात केवळ बटण दाबल्याबरोबर पाणीपुरवठा होतो. तशी यंत्रणा धुळय़ासाठी कार्यान्वित केली जाईल. त्याकरिता आमदार अमरीशभाई पटेल यांची मदत घेतली जाईल. तांत्रिक बाबीत सकाळपासून योग्यरीत्या नियोजन केले, तर पाण्याची समस्या कोणत्याही भागात निर्माण होत नाही. तसेच लोकांना पुरेसे पाणी मिळते. त्याकरिता जिथून पाणीपुरवठा होतो ते ठिकाण, जलशुद्धीकरण केंद्रे आणि वितरण यंत्रणा यांचा मेळ घातला जाईल. तीनदा शुद्धीकरण केलेले पाणी पुरवण्यासोबत नकाणे, डेडरगाव व अक्कलपाडा योजनांच्या वाहिन्यांना एकत्रित केले जाईल.