आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाद झालेल्या नाेटा बदलून देण्यात पाेलिसांचीच ‘दलाली’, पुण्यात दीड काेटींच्या जुन्या नाेटा जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ८ नाेव्हेंबर राेजी हजार व पाचशेच्या नाेटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक काळ्या पैशावाल्यांनी बँक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अापला पैसा ‘पांढरा’ करून घेतल्याचे उघडकीस अाले अाहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांना नंतर अटकही झाली. मात्र काही पाेलिस कर्मचारीही जुन्या नाेटा बदलून देण्याच्या रॅकेटमध्ये ‘दलाला’चे काम करत असल्याचे पुण्यात उघडकीस अाले अाहे.  
 
याप्रकरणी पुण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकासह पाच जणांची चाैकशी सहायक पाेलिस अायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केली जात अाहे. दरम्यान, २४ फेब्रुवारी दिघी परिसरात केलेल्या दुसऱ्या कारवाईत १ काेटी ३६ लाख रुपयांच्या जुन्या नाेटा जप्त करण्यात हाेत्या. त्याची माहितीही बुधवारी पाेलिसांकडून देण्यात अाली.  
 
नाेटाबंदीच्या निर्णयानंतर पाेलिस व अायकर खात्याने देशभरात ठिकठिकाणी छापे टाकून काेट्यवधी रुपयांचे बाद चलन जप्त केले. मात्र त्यानंतरही अजूनही राज्यात जुन्या नाेटा बदलून देण्याचे रॅकेट सक्रिय असल्याचे उघडकीस येत अाहे. पुण्यात दाेन फेब्रुवारी राेजी पाेलिसांनी मध्यस्थाची भूमिका पार पाडत, काळे पैसे बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांकडून रक्कम  उकळल्याची घटना समाेर अाली हाेती. मात्र  त्याची वाच्यता अद्याप कुठे करण्यात अाली नव्हती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काेथरूड पाेलिस स्टेशनला वेळाेवेळी मदत देत असलेल्या एका व्यापाऱ्यास, पाेलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने जुन्या नाेटा बदलुन देताे, असे सांगून काेथरूडमधील शिवाजी पुतळ्याजवळ बाेलवून घेतले हाेते. त्यानुसार चार व्यापारी जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नाेटांमधील ४० लाख रुपये घेऊन कारमध्ये घटनास्थळी अाले. त्यानंतर व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पाेलिसांनी अाणखी २३ लाख रुपये उकळल्याचे उघड झाले अाहे.   

दाेन फेब्रुवारी राेजी रात्री उशिरा ही कारवाई केल्याची नाेंद पाेलिसांनी स्टेशन डायरीला केली. मात्र त्या वेळी केवळ २० लाख रुपये मिळाल्याची नाेंद करण्यात अाली हाेती. मात्र याप्रकरणी काेणताही गुन्हा दाखल केला नव्हता. तसेच अायकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात अाली नाही की संबंधित व्यापाऱ्यांना अटक करण्यात अाली नाही. मात्र अाता हे प्रकरण चव्हाट्यावर अाले अाहे. 

दिघीत मिळाले एक काेटी ३६ लाख   
दिघी पाेलिसांनी जुन्या ५०० अाणि १००० रुपयांच्या नाेटा बदली करण्यास जात असलेल्या तीन जणांना २४ फेब्रुवारी राेजी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक काेटी ३६ लाख २६ हजार रुपये जप्त करण्यात अाले असून ते अायकर विभागाला साेपवण्यात अाले अाहेत. मात्र, घटनेच्या चार दिवसांनंतर पाेलिसांनी याबाबत खात्री केली अाहे. काेथरूड अाणि दिघी या दाेन प्रकरणांत संबंध अाहे का, याची चाैकशी करण्यात येत अाहे.    

ठाण्यात ९६ लाखांच्या जुन्या नोटा जप्त; चार जण अटकेत
नोटाबंदीनंतरच्या तीन महिन्यांनंतर ठाण्यात दोन वेगवेगळ्या घटनांत पोलिसांनी ९६ लाखांच्या पाचशे व हजारच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. पहिल्या घटनेत तलाव पाली परिसरात पोलिस वाहनांची तपासणी करत असताना एका कारमध्ये ४६ लाख रुपये सापडले. यात सर्व नोटा या पाचशे व हजार रुपयांच्या होत्या. याप्रकरणी  ज्ञानेश्वर यादव, पंकज गोयल आणि सुनिक भानुशाली यांना अटक करण्यात आली.
 
दुसऱ्या घटनेत गोल्डन डियेस नाका येथे चेतन रंधावा याच्या वाहनाची तपासणी केली असता त्याच्याकडे ५० लाखांच्या पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा सापडल्या. याप्रकरणी पोलिसांनी चौघांनाही अटक केली असून प्रकरण आयकर विभागाकडे हस्तांतरित केले आहे. या रॅकेटमध्ये अन्य काेणाचा सहभाग अाहे हेही तपासले जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...