आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1 Lakh 35 Thousand Application For Thenth Supplyment Examination

दहावी पुरवणी परीक्षेसाठी १ लाख ३५ हजार अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - यंदा प्रथमच जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणा-या दहावी पुरवणी परीक्षेसाठी राज्यभरातून एक लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी व्यक्त केली.

राज्य शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल (इयत्ता दहावी) जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाला. या परीक्षेत जी मुले अनुत्तीर्ण झाली, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तातडीने दहावीच्या फेरपरीक्षेसाठीचे आदेश दिले. त्यानुसार आॅक्टोबरऐवजी जुलै-ऑगस्टमध्येच फेरपरीक्षेचा निर्णय घेण्यात आला. अल्पावधीत पुन्हा परीक्षा घेण्याचे काम राज्य परीक्षा मंडळावर पडले. मात्र, पुरवणी परीक्षेची तयारी युद्ध पातळीवर करून मंडळ सज्ज झाले आहे. फेरपरीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने मंडळाने शाळांकडून अर्ज मागवले होते. २७ जूनपर्यंत अर्ज दाखल करायचे होते. राज्य शासनाच्या या नव्या निर्णयानुसार अनुत्तीर्ण विद्यार्थी, श्रेणीसुधार करू इच्छिणारे विद्यार्थी, अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ही पुरवणी परीक्षा २१ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे.
विद्यार्थी संख्या
>मार्च २०१५ मधील परीक्षा १५ लाख ७२ हजार २६८ विद्यार्थ्यांनी दिली.
>१४ लाख ३७ हजार ९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले
>एक लाख ३४ हजार ३४६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले
>आकडेवारीवरून सर्व अनुत्तीर्ण विद्यार्थी पुरवणी परीक्षेला बसणार आहेत.