आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 100 Milimeter Rain Recorded In Kokan, But Slow In Marathwada

कोकणात 24 तासांत 100 मि.मी पावसाची नोंद, मराठवाड्यात मात्र रिमझिम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे, मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वदूर पावसाने संततधार ठेका धरला असून पुढील दोन दिवसांतही ही आभाळमाया कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. कोकणात गेल्या 24 तासांत 100 मि. मी. पावसाची नोंद झाली असून या भागातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. विदर्भातही पावसाचा जोर कायम आहे. मराठवाड्यात मात्र रिमझिम हजेरी लावणारा पाऊस खरीप पिकांसाठी लाभदायक मानला जातो.


जुलैच्या दुस-याच आठवड्यात राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सोलापूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांमधील पावसाची सरासरी 76 ते 100 टक्के आहे. गेल्या दोन वर्षांची कसर यंदाच्या जुलैत भरून निघण्याची आशा निर्माण झाली आहे.


गेल्या 24 तासांत मोसमी पाऊस संपूर्ण महाराष्‍ट्रात सक्रिय होता. कोकण, मध्य महाराष्‍ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भातील भामरागड येथे राज्यातील सर्वाधिक 250 मिलिमीटर पाऊस बरसला. राज्यातील धरणांमधील आजचा पाणीसाठा 36 टक्के झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला पाणीसाठा फक्त 16 टक्के होता.


मध्य अरबी समुद्रात मान्सून जोरदारपणे सक्रिय झाला आहे. किनारपट्टीवरचे कमी दाबाचे क्षेत्र आणि झारखंड-छत्तीसगडजवळचे कमी दाबाचे क्षेत्र यामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त ढग महाराष्ट्राच्या
भूभागाकडे खेचले जात आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र मोसमी पाऊस बरसू लागला आहे, असे पुणे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.


खालापूर, कर्जतला दीडशे मिमी
कोकणातील खालापूर, पालघर, कर्जत माथेरान, श्रीवर्धन अशा अनेक गावांमध्ये तब्बल दीडशे मिलिमीटरपेक्षा अधिक मुसळधार पाऊस कोसळला. रायगड जिल्ह्यातील तळा येथे 210 मिलिमीटरची अतिवृष्टी झाली. कोकणातील सर्व नद्यांना पूर आला असून कोकणातील लहान-मोठ्या धरणांमधील पाणीसाठ्याची टक्केवारी सत्तरच्या पुढे गेली आहे.


कोयना धरणाची पाणी पातळी वाढली
मध्य महाराष्‍ट्र : सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांमधील दुष्काळी तालुक्यांतही पावसाने तोंड काढले आहे. महाबळेश्वर, गगनबावडा, राधानगरी या हमखास पावसाच्या भागात पावसाने शंभर मिलिमीटरचा आकडा ओलांडला. सह्याद्री घाटमाथ्यावरच्या धुवाधार पावसामुळे कोयना धरणाची जलपातळी वेगाने वाढली असली तरी उजनीचा साठा वाढण्यास अजून सुरुवात झालेली नाही.
मराठवाडा : कोकण-मध्य महाराष्‍ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात पाऊसमान कमी होते. परभणी, उदगीर, निलंगा, देगलूर, अंबाजोगाई, पूर्णा या शहरांमध्ये चाळीस ते पन्नास मिलिमीटर नोंद झाली. मराठवाड्यात सर्वत्र ढगाळ, पावसाळी हवामान असून रिमझिम, मध्यम पाऊस सुरू आहे. धरणसाठ्याच्या दृष्टीने मराठवाड्यात अजून दमदार पाऊस झालेला नाही. खरीप पिकांसाठी मात्र दिलासादायक स्थिती आहे.
विदर्भ : आंध्र प्रदेशच्या सीमेवरील जंगल क्षेत्रात तुफानी पाऊस झाला. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. नागपूर-अमरावती विभागातील धरणांचा पाणीसाठाही वेगाने पन्नास टक्क्यांपुढे जाण्याची चिन्हे आहेत.
राज्यात 32 टक्के जलसाठा
राज्यातील 2 हजार 464 लघु, मध्यम आणि मोठ्या सिंचन प्रकल्पांत आजमितीस 9 हजार 914 दलघमी (32 टक्के) पाणीसाठा आहे. कोकण : 158 धरणांमध्ये 72, नागपूर : 366 धरणांमध्ये 53 टक्के, अमरावती : 376 धरणांमध्ये 44 टक्के, पुणे : 411 धरणांमध्ये 37 टक्के, तर नाशिक : 350 धरणांमध्ये 17 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मराठवाड्यात लघु, मध्यम आणि मोठी 803 सिंचन प्रकल्प आहेत. त्यामध्ये आजमितीस 659 दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून त्याची टक्केवारी 9 टक्के आहे.


‘कुंडलिका’ धोक्याच्या पातळीवर
रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोह्याजवळील अष्टमी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.


24 तासांतील पाऊस
मुंबई - 30.2, ठाणे - 101, रायगड - 116.7, रत्नागिरी - 102.9, सिंधुदुर्ग - 105.1, नाशिक - 20.4, धुळे - 14.8, जळगाव - 3.3, नगर - 1.9, पुणे - 16, सोलापूर - 11.4, औरंगाबाद - 6.1, जालना - 6.8, बीड - 11.2, लातूर - 29.8, उस्मानाबाद - 15, नांदेड - 14.4, परभणी - 13.8, हिंगोली - 8.4, अकोला - 2.3, अमरावती - 11.8, नागपूर - 24.8.


पावसाला अनुकूल हवामान
ओडिशाच्या किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडकडे सरकले आहे. दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंतचे कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे कोकण-विदर्भात मुसळधार, तर मध्य, उत्तर महाराष्‍ट्र आणि मराठवाड्यातही मध्यम पावसाचा अंदाज आहे.’’ डॉ. मेधा खोले, उपसंचालक भारतीय हवामान विभाग