आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड जिल्ह्यात १२ व्या शतकातील लेणींचा शाेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कूर्डगडावर अाजवर नाेंद न झालेली प्राचीन शिलाहारकालीन लेणी संशोधनातून समोर आली आहे. पुरातन अशा देवघाट, लिंग्या घाट या व्यापारी मार्गाच्या संरक्षणार्थ असलेले कूर्डगड हे लष्करी ठाणे हाेते. प्राथमिक पाहणीनुसार या लेणीचा कालावधी १० ते १२ व्या शतकातील असावा, असा अभ्यासकांचा निष्कर्ष असल्याची माहिती महाड येथील इतिहास अभ्यासक अंजय धनवडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.

धनवडे म्हणाले, निवासासाठी असणारी दाेन लेणी, एक खांब टाके, एक काेरडी टाकी अशा चार कातळ काेरीव शिलाहारकालीन लेणींचा यामध्ये समावेश अाहे. या कातळ काेरीव गुहा मानवनिर्मित असून येथे धार्मिक अलंकरण दिसत नाही. त्यामुळे या लेणींचा उपयाेग हा धार्मिक कामांसाठी करण्यात अाला असावा. संपूर्ण लेणीमध्ये कातळात खाेदलेल्या खाेबण्या असून लाकडी फ्रेमसाठी त्याचा वापर झाला असू शकताे. मराठा काळात लेणीचा तळभाग खाेदून त्याचा पाणी साठवण्यासाठी टाकी म्हणून वापर केल्याच्या पाऊलखुणा अाहेत. पाणी अडवण्यासाठी या ठिकाणी दगडी बांधकाम पक्के करण्यासाठी चुना व रेतीचा वापर करण्यात अाला अाहे.

तसेच सुळक्याच्या पायथ्याशी कूर्डाई देवीच्या मंदिर परिसरात चार विरगळ व एक गजलक्ष्मीचे शिल्पदेखील अाहे. हे सर्व घटक पाहता शिवपूर्व काळातील उत्तर काेकणचे राज्यकर्ते शिलाहारांच्या काळात याची निर्मिती झाली असावी, असा प्राथिमक निष्कर्ष असून त्यावर पुढील संशाेधनाचे काम सुरू अाहे. गिर्याराेहक डाॅ. राहुल वारंगे, अॅड. प्रशांत भुतकर, समृद्धी भुतकर, रूपेश वनारसे,चिंतन वैष्णव, भूषण शेठ, अमित गुरव, अाेंकार माने यांच्या सहकार्याने ही लेणी शाेधण्यात अाली अाहे.

अभ्यास करावा लागेल
पुण्यातील डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्त्व विभागाचे प्रा. डाॅ. प्रमाेद जाेगळेकर लेणींबाबत म्हणाले, १० व्या शतकानंतर व १२ व्या शतकापूर्वी या शिलाहारकालीन लेणींचा कालावधी असून ती पहिल्यांदाच सापडली अाली अाहे. प्राथमिक अंदाजानुसार, या लेणींचा अाणखी अभ्यास करणे गरजेचे असून या ठिकाणी अाणखी जुने अवशेष सापडतात का? याची तपासणी करावी लागेल.

लेणीच्या शाेधासाठी अवघड चढाई
डाॅ. वारंगे म्हणाले, कूर्डगडावरील सुळक्याच्या पश्चिमेकडील बाजूस असणाऱ्या कातळकाेरीव गुहांबद्दल अंजय धनवडे यांनी अाम्हाला माहिती दिली होती. मात्र, लेणीबाबत आजवर कोणीही अभ्यास केला नव्हता. यासाठी प्रस्तराराेहणाचे काैशल्य गरजेचे असल्यामुळे महाडमधील सह्याद्री मित्र संस्थेच्या मदतीने ४० फूट कातळाराेहण व पुढे ६० फुटांची घसारायुक्त चढार्इ करून अाम्ही त्या ठिकाणी पाेहोचलाे असता अाम्हास चार लेणी अाढळल्या. ‘एल’ अाकाराचे या ठिकाणी एक दालन असून ते सध्या पाण्याने भरलेले अाहे. त्याला भग्नावस्थेतील कातळकाेरीव प्रवेशद्वार अाहे.