आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्य भरतीचे पेपर फोडणारे रॅकेट उद्ध्वस्त, 18 दलालांना अटक; रविवारी झालेली भरती परीक्षा रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - लष्करातील नागरी पदांच्या भरतीसाठी आयोजित परीक्षेचा पेपर फुटल्याने खळबळ माजली असून ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडक कारवाई करत पेपर फोडणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले. रविवारी सकाळी पुणे, नागपूर आणि गोवा या तीन ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून पोलिसांनी तब्बल १८ दलाल आणि ३५० उमेदवारांना ताब्यात घेतले. परिणामी रविवारी झालेली सैन्य भरती परीक्षाच रद्द करण्यात आली असून एका महिन्यानंतर पुन्हा ही लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
 
राज्यात नऊ केंद्रांवर रविवारी अकरा वाजता सैन्य भरतीसाठीची लेखी परीक्षा झाली. मात्र या परीक्षेचा पेपर अगोदरच फुटल्याने खळबळ उडाली. प्रत्येकी ३ लाख रुपये घेऊन हा पेपर फोडण्यात आला होता. या पेपरची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असल्याची बाब पोलिस तपासातून निष्पन्न झाली आहे. या प्रकरणी अधिक चौकशीचे आदेश संरक्षण विभागाला दिले असून चौकशी अहवाल त्वरित सादर करण्यास सांगितल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. ठाण्यात सैन्य भरतीच्या पूर्वतयारीसाठी खासगी क्लास चालवणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना ही माहिती दिली. आपल्या विद्यार्थ्यांशी काही दलालांनी संपर्क साधला असून त्यांना ३ लाखांत पेपर पुरवण्याची तयारी दलालांनी दाखवल्याचे या क्लासचालकाने पोलिसांना कळवले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

नागपुरातही कारवाई, आठ जणांना अटक
शहरातील एका मंगल कार्यालयात जमलेल्या अडीचशे उमेदवारांना हा पेपर सोडवून दाखवला जात असल्याचा प्रकार नागपूर पोलिसांनी उघडकीस आणला. यासंदर्भात ८ जणांना अटक केली. सातारा जिल्ह्यातील राज्य छत्रपती अकादमी तसेच नागपुरातील काही जणांच्या समन्वयातून हे रॅकेट सक्रिय होते. या रॅकेटच्या सूत्रधारासह नागपूर परिसरातील कोचिंगअकादमीच्या संचालकांना अटक केली आहे. छत्रपती अकादमीचा प्रमुख संतोष शिंदे हा प्रश्नपत्रिकेतील २९ प्रश्न सोडवून दाखवत होता. दरम्यान, पोलिसांनी शिंदे, सुभाष निर्मळे, प्रसाद धानोड, वैभव शिसोदे, जयकुमार बेलखेडे, संदीप भुजबळ, संदीप नागरे, किरण गभने यांना अटक केली आहे. 

परीक्षा सुरू हाेण्यापूर्वीच पुण्यातही धडक कारवाई, नऊ जण अटकेत
लष्करातील नागरी पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी पुण्यात नऊ जणांना अटक करण्यात आली. सुमारे ९० उमेदवारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हडपसर पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाई सुरू केली होती. ठाणे पोलिसांकडून पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना माहिती देण्यात आली.
 
त्यानंतर सहायक आयुक्त सुरेश भोसले आणि यूनिट एकचे विनोद पाटील यांनी पथकासमवेत तपास करून आरोपींना पकडले. संतोष शिंदे आणि धनाजी जाधव यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात भेकराईनगर येथे रविवारी सकाळी ९ वाजता ही परीक्षा होणार होती. मात्र त्यापूर्वीच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेपर फुटल्याची बातमी पसरली. अटक केलेल्या जाधववर यापूर्वीही सैन्यदलातील घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल आहे. जाधव व शिंदे यांनी आरोपित ७० ते ८० विद्यार्थ्यांना शनिवारी रात्री उशिरा भेकराईनगर येथील लॉज, वसतिगृहे येथे बोलावले होते.

३५० उमेदवारांची कसून चौकशी
पेपरफुटीप्रकरणी १८ जण ठाणे पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यासोबत पुणे, नागपूर व गोव्यातून ३५० परीक्षार्थींनाही ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती ठाणे सहआयुक्त आशुतोष डंुबरे यांनी दिली. कारवाईच्या वेळी जप्त प्रश्नपत्रिकेसंदर्भात आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसरकडून शहानिशा करून घेतली असता या प्रश्नपत्रिका खऱ्या असल्याचे डंुबरे यांनी सांगितले.

लष्कराचे अधिकारी रॅकेटमध्ये सहभागी
या प्रकरणात काही वरिष्ठ लष्करी अधिकारीदेखील सहभागी असल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी धनाजी जाधव या आरोपीवर अगोदरही सैन्य भरतीचे पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. 


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...