आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठरली, संजूबाबाच्या सुटकेची तारीख ठरली, 25 फेब्रुवारीला जेलबाहेर येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय दत्त (फाईल फोटो) - Divya Marathi
संजय दत्त (फाईल फोटो)
पुणे- मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदेशिररित्या शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली सध्या येथील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला संजय दत्त येत्या 25 फेब्रुवारीला जेलमधून कायमचा सुटणार आहे. 25 फेब्रुवारी रोजी संजय दत्तची जेलमधून सुटका करण्याची तयारी येरवडा कारागृह प्रशासनाने सुरु केली आहे.
चांगल्या वर्तणूकीमुळे संजयला 105 दिवस आधी जेलमधून घरी सोडण्यास राज्य सरकारच्या गृह विभागाने हिरवा कंदिल दाखवला आहे. नियमानुसार संजय दत्तची शिक्षा 7 मार्चला संपत आहे. मात्र, जेल अधिक्षकांनी संजयची शिक्षा 10 दिवसांनी कमी केली आहे. कैद्याची वागणूक पाहून जेल अधिक्षकाला 30 दिवसाची शिक्षा कमी करण्याचा अधिकार असतो. त्यानुसार तो 25 फेब्रुवारीपर्यंत स्वगृही परतेल.
संजय दत्त 21 मे 2013 पासून पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी आढळल्यानंतर त्याला 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, कोर्टाने शिक्षा सुनावण्यापूर्वीच संजय दत्तने 18 महिने जेलमध्ये घालवले होते. त्यामुळे त्याला साडेतीन वर्षाचीच शिक्षा भोगावी लागणार होती. आता संजय दत्तने दोन वर्षे 10 महिने शिक्षा भोगली आहे. मात्र, प्रत्येक कैद्याला शिक्षेमध्ये 114 दिवसांपर्यंत सुट मिळते. त्यानुसार संबंधित कैद्यांची सरासरी चार महिने आधी सुटका होऊ शकते. शिवाय चांगल्या वर्तणुकीमुळेही कैद्यांची वेळेआधीच सुटका करण्यात येते. तशीच सूट संजयला मिळणार आहे. सेलिब्रेटी असल्याने संजय दत्तशी संबंधित घडामोडीवर माध्यमे व समाजातील जागृत नागरिकांचे लक्ष असते. त्यामुळे संजय दत्तच्या बाबतीत सामान्य कैद्यांना मिळणा-या सुविधा व सुट याप्रमाणेच न्याय दिला जाणार आहे.
कैद्याची वागणूक पाहून जेल अधिक्षक 30 दिवस, उपमहानिरीक्षक 60 दिवस तर अप्पर पोलिस महासंचालक 90 दिवस शिक्षा कमी करू शकतात. मात्र, संजयला या तिघांकडून कोणतेही सूट मिळणार नसल्याचे समजते आहे. संजय दत्तला पॅरोल व फर्लोची रजा मंजूर झाल्यानंतर वेळोवेळी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
संजय दत्तला याआधी शिक्षा भोगत असताना दोन वेळा पॅरोल आणि दोन वेळा फर्लोची रजा मंजूर करण्यात आली होती. एखाद्या कैद्याला 14 दिवसाची फर्लो रजा मिळते तर ती आणखी 14 दिवसांनी वाढवता येते. तर पॅरोलची रजा 30 दिवस दिली जाते. ती रजा ही 30-30 दिवसांनी वाढविता येते. संजयने पॅरोल व फर्लोचा पुरेपूर फायदा घेतला आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत संजयने 120 दिवस जेलबाहेर काढले आहेत. मात्र नियमानुसार हे सर्व दिवस शिक्षेमध्ये मोजले जातात.
शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराची वर्तणूक चांगली असेल तर तीन दिवस तर शिक्षेदरम्यान जेल प्रशासनाने दिलेले काम चोखपणे बजावल्यास चार दिवसाची सुट अशी महिनाभरात सात दिवसाची सुट दिली जाते. ती संपूर्ण शिक्षेच्या कालावधीतून वजा करून कैद्याची शिक्षा कमी होते. या सर्व सुटींचा आढावा घेतल्यास संजय दत्तची शिक्षा 7 मार्चपर्यंत संपते. मात्र, जेल अधिक्षकांनी 10 दिवसाची शिक्षा कमी केल्याने तो 25 फेब्रुवारीला जेलमधून कायमचा सुटणार आहे.
बातम्या आणखी आहेत...