पुणे- मूलाची जबाबदारी नको म्हणून दोन महिन्यांपूर्वी जन्मला आलेल्या चिमुरडीची हत्या खुद्द आईनेच केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आईला अटक केली आहे.
मैत्री विजय पाटेकर असे या चिमुरडीचे नाव आहे तर याप्रकरणी तिची आई वैशाली ऊर्फ सुषमा विजय पाटेकर (22, रा. बुधवार पेठ) हिला पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडीतील ओटास्किममधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीच्या दुस-या मजल्यावरून आईने आज सकाळी सहाच्या सुमारास घरातील सर्वांची नजर चुकवून फेकडून दिले. यात दोन महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली हिचे विजय पाटेकर याच्याशी विवाह झाला आहे. दरम्यान, सहा महिन्यापूर्वी ती आपल्या आई-वडिलांकडे निगडीत बाळांतपणासाठी आली होती. दोन महिन्यांपूर्वी मैत्रीचा जन्म झाला. आज सकाळी सर्व जण घरात झोपले असताना नजर चुकवून वैशालीने मैत्रीला खाली फेकून दिले. आजूबाजूच्या लोकांनी वैशालीच्या घरी माहिती दिली तेव्हा सर्वजण घरात होते. मात्र, आम्हाला मुलगी खाली पडल्याची माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला. यानंतर तिला पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मैत्रीचा मृत्यू झाला.
दरम्यान, मैत्री खाली कशी काय खाली पडली याचा पोलिसांनी शोध सुरु केला. मैत्रीची आई वैशाली, वैशालीची बहिण आई-वडिल घरात असताना दोन महिन्याची चिमुरडी खाली पडू शकत नाही असे पोलिसांचे म्हणणे होते. पोलिसांना हा घातपाताचा प्रकार असल्याचे सांगत आई वैशालीला ताब्यात घेतले. पोलिसांनी वैशालीच्या नव-याकडून माहिती घेतली. त्यात वैशाली व पतीत पटत नसल्याचे समोर आले आहे. शिवाय तिला नांदायला रस नाही असे तिच्या नव-याकडून माहिती मिळाली आहे. पतीसोबत पटत नसल्याने व तिकडे जाण्याची इच्छा नसल्यानेच वैशालीने दोन महिन्यांच्या चिमुरडीला दुस-या मजल्यावरून फेकून मारल्याचे तपासात स्पष्ट झाले.