आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखद सोमवार: थाळीत अन्न शिल्लक न ठेवल्यास मिळते 30 रुपये सवलत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देशात दररोज १९.४६ कोटी लोक अर्धपोटी राहतात. भूकबळींच्या संख्येतही चीनला मागे टाकून भारत अव्वलस्थानी आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेच्या (एएफओ) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातील हे वास्तव आहे. त्याच वेळी लग्नसमारंभ, वाढदिवस, पार्ट्यांत अनेकदा बरेच अन्न वाया जाताना दिसते. या प्रकारावर मात करण्यासाठी पुण्यातील दूर्वांकुर डायनिंग हाॅलचे मालक श्यामराव मानकर यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. थाळीतील सर्व अन्नपदार्थ संपवल्यास येथे ग्राहकाला बिलात विशेष सवलत दिली जाते. तसा खास फलकच रेस्तराँमध्ये लावण्यात आलेला आहे.

अन्न हे पूर्णब्रह्म हे वचन पोथ्या-पुराणांतच अडकून पडले की काय असे वाटावे एवढी अन्नाची नासाडी देशात होते आहे. त्याच वेळी अन्नावाचून उपाशीपोटींची संख्याही मोठी आहे. ही नासाडी टाळण्यासाठी दूर्वांकुर डायनिंग हाॅलने कल्पकता वापरली. चारमजली रेस्तराँत प्रवेश केल्यापासून जेवणाच्या ताटापर्यंत सर्वत्र 'अन्नाची नासाडी टाळा' हाच संदेश अाहे. जागरूकता तर येतेच, शिवाय ताटात अन्न राहिल्यास जादा पैसे द्यावे लागतील हा विचारही होतो.

दररोज ६० किलो अन्न नासाडी टळली
दूर्वांकुरच्या थाळीचा दर २५० रुपये आहे. अन्न ताटात टाकून दिले नाही तर ३० रुपये सवलत मिळते. म्हणजे थाळी २२० रुपयांना पडते. हाॅटेलात रोज ७०० ते ८०० खवय्ये येतात. शनिवार, रविवारी ही संख्या १५०० पर्यंत जाते. या उपक्रमाआधी हाॅटेलमध्ये रोज सुमारे ७० ते ८० किलो अन्न वाया जात होते. आता हे प्रमाण १५ ते २० किलोवर आले आहे.

दूर्वांकुरची पाटी अमेरिकेतही चर्चेत
दूर्वांकुरची पाटी सोशल मीडियावर पसरत आहे. मूळ नागपूरच्या परंतु सध्या अमेरिकेत असलेल्या एकाने दूर्वांकुरचा क्रमांक मिळवून उपक्रमाचे कौतुक केले. यामुळे ग्राहकांशी वाद होतो का? ग्राहक संख्या रोडावली काय? अशी विचारणा त्याने केली. त्यावर मानकर म्हणाले, सवलत दिल्याने अन्न नासाडी टळते. ग्राहकांचा उपक्रमाला पाठिंबा मिळतो. पुढे अमेरिकेतून आल्यावर या व्यक्तीने दूर्वांकुरच्या थाळीचा आवर्जून आस्वाद घेतला.

आधी गंमत वाटली; पण...
अन्न न वाया घातल्यास डिस्काउंट देणा-या पाटीची आधी गंमत वाटली, पण आजूबाजूचे लोक ताट स्वच्छ करताना पाहून गांभीर्य लक्षात आले, असे भावंडांसह जेवण्यासाठी आलेल्या यशोदा वाकणकर सांगत होत्या. दूर्वांकूरचे वाढपी अगत्याने वाढतात, लोक स्वाद घेत पाने साफ करतात.