आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनाध्यक्ष निवडणुकीची तयारी: चाळीस मतपत्रिका माघारी!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सासवड येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पाठवण्यात आलेल्या मतपत्रिकांपैकी 40 मतपत्रिका परत आल्या आहेत. एकूण 1069 मतदारांपैकी 722 मतदारांना मतपत्रिका पोचल्याची नोंद निवडणूक अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी केली आहे.


मतदारांना तीन सप्टेंबरला रजिस्टर एडीने मतपत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. त्यापैकी 23 सप्टेंबरपर्यंत 722 मतदारांना मतपत्रिका मिळाल्या. मात्र पत्ता चुकीचा असणे, घराला कुलूप असणे, कुणीच क्लेम न सांगणे अशा कारणांमुळे 40 मतपत्रिका माघारी आल्या आहेत. ज्यांना मतपत्रिका पुन्हा हव्या असतील, त्यांनी दुबार मतपत्रिकेसाठी अर्ज दाखल केल्यास त्यांना पुन्हा मतपत्रिका पाठवण्यात येतील, असे अ‍ॅड. आडकर म्हणाले.


आजपर्यंत फक्त हैदराबाद येथील एका मतदारानेच अर्ज केला असून, त्यांना मतपत्रिका पुन्हा पाठवण्यात आली आहे, असे आडकर म्हणाले. त्यामुळे उर्वरीत 39 मतपत्रिकांचे काय, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. 23 सप्टेंबरअखेर 150 जणांनी मतदान केले असून, 15 ऑक्टोबरपर्यंतचा मतदानासाठी मुदत आहे.


मसापची जीबी वादळी
महाराष्ट्र साहित्य परिषदेची सोमवारी झालेली सर्वसाधारण सभा विविध मुद्द्यांवरून वादळी ठरली. बेळगाव येथे मसापची शाखा सुरू करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव सभेत मांडण्यात येताच काही सदस्यांनी भावनात्मक आणि अस्मितेचा प्रश्न म्हणून बेळगाव शाखेला त्वरित मान्यता देण्याचे आवाहन केले. मात्र बेळगाव शाखेसाठी तो परिसर मसापच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे काही सभासदांनी लक्षात आणून दिल्यावर आणि त्यासाठी घटनादुरुस्ती अनिवार्य ठरेल, हे लक्षात आल्यावर हा विषय साहित्य महामंडळाच्या बैठकीत चर्चिला जावा, असा निर्णय घेण्यात आला.