आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 50 day Strike At Bajaj Auto's Chakan Plant Called Off

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजाज कामगारांचा संप अखेर मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बजाज ऑटोच्या चाकण प्रकल्पातील कामगारांनी 25 जूनपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन मंगळवारी मागे घेतले. मात्र, कामावर हजर राहूनही आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.

सण, उत्सवाच्या काळात ग्राहकांच्या मागणीचा, उद्योगाच्या हिताचा विचार करून संप मागे घेत असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. वेतन करार लांबवणे, कामगारांना गुलाम संबोधणे, दहशत पसरवणे याविरुद्ध 50 दिवसांपासून सुमारे एक हजार कामगार संपावर होते.

कामगारांनी विश्व कल्याण कामगार संघटना आणि र्शमिक एकता महासंघाच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन छेडले होते. कंपनीचे व्यवस्थापन आणि कामगारांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चेच्या अनेक फेर्‍या होऊनही दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने मार्ग निघणे अवघड बनले होते. या पार्श्वभूमीवर बजाजच्या पल्सर गाड्यांचे उत्पादन औरंगाबादमधील प्रकल्पातून घेणे सुरू करण्यात आले आणि चाकण प्रकल्प कंत्राटी कामगारांच्या हाती सोपवण्यात आला होता.

दसरा-दिवाळीच्या तोंडावर दुचाकींची वाढती मागणी लक्षात घेऊन बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राजीव बजाज यांनी कामगारांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा उत्पादन औरंगाबादमध्ये हलवले जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यावर मंगळवारी कामगारांनी आंदोलन मागे घेतले. मात्र व्यवस्थापनाच्या अटी मान्य न करता, कामगारांच्या मागण्या कायम ठेवूनच काम सुरू करत असल्याचे कामगारांनी स्पष्ट केले.

आकुर्डी येथील र्शमशक्ती भवन येथे झालेल्या सभेत विश्व कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, नामदेव जाधव, मारुती भापकर, किशोर ढोकळे आदींनी भाषणे केली. कामगार उद्यापासून (बुधवार) कामावर रुजू होतील मात्र व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांवर चर्चा तातडीने करावी व सप्टेंबरच्या आधी निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.