आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी ६० % मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारअखेरपर्यंत सुमारे ६० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. हे प्रमाण समाधानकारक नसले तरी अखेरच्या दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यातून एकगट्ठा मतपत्रिका मिळतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ८० च्या पुढे जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घुमान येथे एप्रिल २०१५ मध्ये संमेलन होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिका-यांकडे पोहोचण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर आहे. १० डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. निवडणुकीसाठी एक हजार सत्तर मतपत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. त्यापैकी सोमवारअखेरपर्यंत ६६० मतपत्रिका महामंडळाला प्राप्त झाल्या, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी दिली.

चार जणांमध्ये स्पर्धा
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, भारत सासणे, डॉ. अशोक कामत आणि पुरुषोत्तम नागपुरे हे चार उमेदवार अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून अखेरच्या दिवशी एकगठ्ठा मतपत्रिका पाठवण्याचा ट्रेंड रुळला आहे. हे वर्ष त्याला अपवाद ठरणार नाही, असे चित्र दिसत आहे.