आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्नर: बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू, वनविभागाला सशक्त बनवण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथे अंगाणात झोपलेल्या वृद्ध महिलेवर मंगळवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला. वनविभागाच्या कर्मचार्‍यांना छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास परिसरात सापडला. सखुबाई नाना हिले (60) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
दरम्यान, जुन्नर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून मागील दोन महिन्यात चार जणांचा बळी घेतला आहे. वनविभागाकडून बिबट्यांना पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अपुऱ्या सुरक्षा साधनांअभावी त्यांना अपयश येत असून त्यांना आवश्यक ती साधने पुरवावीत, तसेच वन विभागाची कुमक वाढविण्यात यावी, अशी मागणी जुन्नर तालुका मंडळाचे अध्यक्ष रोहीत खर्गे यांनी केली आहे.
वन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव जोगा येथे शेतात हिले कुटुंब राहत आहेत. उन्हाळ्यामुळे घरात उकाडा होत असल्यामुळे कुटुंब अंगणात झोपले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्याने सखुबाईवर हल्ला चढवत त्यांना फरफटत जंगलात ओढून नेले. बिबट्याच्या या हल्ल्यात सखुबाईचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत गस्त घालणार्‍या वनविभागाच्या कर्मचार्‍यांना मिळाला. जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा- चौथा बळी आहे. या हल्ल्यामुळे पिंपळगाव जोगा या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे अधिकारी लोकवस्तीत येणार्‍या बिबट्यांना पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.
बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाची कुमक वाढवा-
जुन्नर तालुका मंडळाच्या वतीने यासंदर्भात देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, जुन्नर भागातील ऊसतोडणी झाली आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा राहिलेली नाही. त्यातच उन्हाच्या कडाक्यामुळे अन्न व पाण्याच्या शोधात बिबटे नागरी वस्तीमध्ये फिरत आहेत. त्यातून त्यांच्याकडून ग्रामस्थांवर हल्ले चढविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये चारजणांचा बळी गेला आहे. बिबट्यांनी अनेक पाळीव जनावरे फस्त केली आहेत. या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
वनविभागाचे कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्त घालतात. मात्र, बिबट्या पकडण्यासाठी आवश्यक साधने वनविभागाकडे नाहीत. पिंजऱ्यांची संख्या अपुरी आहे. हे पिंजरे देखील नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यातूनच बिबट्या पिंजरा तो़डून जाण्याची घटना नुकतीच डिंगोरी गावामध्ये घडली होती. त्यामुळे येथील ग्रामस्थांबरोबरच वनविभागातील कर्मचाऱ्यांचाही जीव धोक्यात आहेत. माणिकडोहच्या बिबट्या निवारण केंद्रात पकडलेल्या बिबट्यांना ठेवले जाते. मात्र, तेथेही बिबट्यांना ठेवायला पिंजरेच शिल्लक नाहीत. बिबट्यांना पकडण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ वनविभागाकडे नाही. बिबट्या पकडताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीही साधने नाहीत, याकडेही रोहीत खर्गे यांनी लक्ष वेधले आहे.
बातम्या आणखी आहेत...