आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवाई महोत्सवात अनवट रागसौंदर्याचे दर्शन !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अभिजात भारतीय संगीतात काही राग अप्रचलित वा अनवट मानले जातात. अशा अनवट रागांचे सादरीकरण अधिक कौशल्याचे मानले जाते. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या स्वरमंचावर आघाडीचे गायक शौनक अभिषेकी यांनी रविवारी सकाळच्या सत्रात अशा अनवट रागांचे सौंदर्य उलगडले.

शौनक यांनी गायनाचा प्रारंभ राग शिवमत भैरवने केला. ‘डाल डाल पात पात’ ही रचना त्यांनी धीरगंभीरपणे पेश केली. त्यांच्या सुरेल आलापांनी वातावरण भारले गेले. त्यानंतर ‘देवगांधार’ रागात एक बंदिश सादर करून राग जौनपुरीमध्ये त्यांनी पं. बबनराव हळदणकरांची रचना सादर केली. शौनक यांच्या अप्रतिम सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांनी दाद दिली आणि रसिकांच्या विनंतीला मान देत त्यांनी ‘कट्यार काळजात घुसली’मधील ‘घेई छंद मकरंद’ हे सालगवराळी रागातील पद आणि ‘आधी रचिली पंढरी’ हा अभंग उत्कटतेने गायिला. त्यानंतर सारंगीवादक पं. ध्रुव घोष यांनी समयानुकूल असा राग मियाँ की तोडी सादर केला. सारंगी हे वाद्य अलीकडे दुर्मिळ झाल्याने त्यांच्या वादनाविषयीची उत्सुकता रसिकांना होती. ती पूर्ण करत पं. घोष यांनी सारंगीची अनेक वैशिष्ट्ये वादनातून उलगडली. मानवी कंठाला सर्वात जवळचे वाद्य असा लौकिक असणाऱ्या सारंगीवर पं. घोष यांनी नंतर राग जोगिया सादर केला आणि दर्जेदार वादनाची अनुभूती रसिकांना दिली.
गायिका मालिनी राजूरकर यांचा चारुकेशी राग
ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांनी प्रथम राग चारुकेशीने सुरुवात केली. हा राग वाद्यवादनात अधिक प्रचलित आहे. तो फारसा गायिला जात नाही, पण मालिनीताईंनीही अनवट रागांच्या प्रस्तुतीचे वैशिष्ट्य जपत चारुकेशी उत्तम फुलवला. ‘बलमवा परदेस गये’ ही तिलवाडा तालातील रचना, (या तालातही त्यांनी अनवटपणा जपला) सादर केली. त्यानंतर गौडसारंग रागातील ‘छेडो ना नींद मोरी’ ही बंदिश ऐकवून ‘पनघट पे जलभरन मैं कैसे जाऊं’ या भैरवीने सांगता केली. प्रतिवर्षीप्रमाणे मालिनीताईंची प्रगल्भ गायकी, घराण्याची शिस्त आणि सादरीकरणातील दर्जा व साधेपणा हे गुण जाणवले.
बातम्या आणखी आहेत...